प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १
।। श्रीरामसमर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ।।
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
सद्गुरूचरित असे हो अनंत ।
ठाऊक समस्त कोणा होय। ।
वर्णाया नवचे चरित्र हो याचे ।
ओढे हे मनाचे प्रेमास्तव।।
( श्रीसमर्थपाठ - श्री श्रीधरस्वामी कृत )
नमस्कार सज्जनहो…..
आजपासून आपण प.पू श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्राचा रोज थोडा थोडा भाग पाहूया.
- प.पू.प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे चरित्र त्यांच्या अंतरंग शिष्या व स्वामींच्या उत्तराधिकारी प.पू. डाॅ.श्रीमती कमलताई बाळकृष्ण वैद्य यांनी लिहिलेले हे गोष्टी स्वरुपात उपलब्ध आहे.तेच चरित्र आपण पाहू.
- प.पू.कमलताई यांनी स्वामी हयात असताना,स्वामी समक्ष साधना केलेल्या साधक आहेत. स्वामींचा त्यांना तीस ते पस्तीस वर्षे सहवास लाभला आहे.
- या चरित्रामध्ये स्वामींचा कुलपरिचय, स्वामींचा जन्म, बालपण, तरूणपणातील तपश्चर्या, स्वामींना अनुग्रह, बाबा गंगादासांचा सहवास ,रामायणाची गोडी, प.पू वासुदेवानंद सरस्वती स्वामीं कडून संन्यास दीक्षा, यांचे चमत्कार , त्यांचे शिष्य, परंडा रहिवास व शेवटी प्रयाणकाळ अशा विविध अंगानी स्वामींचे चरित्र आपण पाहणार आहोत.
- आज परंडा शहरात स्वामींचे समाधी मंदिर आहे. श्रीहंसराज स्वामी मठात श्री हंसराज स्वामी महाराज, प.पू.श्री अनंतदास महाराज व प.पू.प्रज्ञानानंद स्वामी महाराज अशा तीन समाधी आहेत.प.पू. श्री हंसराज स्वामी म्हणजे रामदास स्वामींच्या परंपरेतले व समर्थ रामदास स्वामींपासून सहावे पुरूष. प.पू. श्री हंसराज स्वामींची देखील समाधी तेथेच आहे.
- प.पू.अनंतदास महाराज रामदासी हे देखील फार मोठे संत व गोभक्त होते. श्री कल्याण स्वामींची जी पालखी श्री क्षेत्र डोमगाव ते श्री क्षेत्र सज्जनगड दरवर्षी दासनवमी करीता सज्जनगडावर जाते ती पालखी परंपरा प.पू.अनंतदास महाराजांनीच सुरू केली.प.पू.अनंतदास महाराजांची मूळ समाधी धाराशिव ( उस्मानाबाद ) येथे आहे; परंतु त्याकाळी महाराजांचे परंड्यात बरेच शिष्य होते. त्यांनी महाराजांच्या थोड्या अस्थी आणून ही समाधी बांधली.
- श्री हंसराज स्वामी मठापासून अगदी दोन मिनीटांच्या अंतरावर प.पू प्रज्ञानानंद सरस्वती स्वामींनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ परंडा शहरातील ज्या जागेत व्यतीत केला त्या जागेवर आज “ श्रीराम विश्राम धाम “ या नावाने श्रीराम मंदीर व प.पू.प्रज्ञानानंद सरस्वती स्वामींचे स्मारकाची भव्य वास्तू उभी आहे. ही वास्तू व्हावी ही स्वामींची ईच्छा होती परंतु काही अडचणीमुळे स्वामींच्या हयातीत ही वास्तू होऊ शकली नाही. नंतर स्वामींच्या शिष्यमंडळींनी 2003 साली ही वास्तू उभी केली व प.पू. मोरारी बापु यांच्या शुभहस्ते प्रभु श्रीराम पंचायतन प्राणप्रतिष्ठा दि. 23 मार्च 2003 रोजी झाली.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
स्वामींची पुस्तके कुठे मिळु शकतात. कोणाशी संपर्क साधावा???
ReplyDeleteवेदशास्त्रसंपन्न श्री. अनुप जोशी गुरूजी
ReplyDelete9420957396
7057260003