प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - २१


प. पू .श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २१

🌹 मराठवाड्यातील वास्तव्य 🌹

     १९५९ साली श्रींचा मुक्काम परंड्यास गेल्यानंतर समाधिकाळापर्यंतचे (१९६८) जास्तीत जास्त वास्तव्य मराठवाड्यांतच झाले. एकदाच नाशिक पंचवटी येथे जाणे झाले व त्यावेळी परत परंड्यास जाताना १९६१ साली थाेडे दिवस इस्लामपूरला जाणे झाले होते. तसेच १९६६ साली काही महिने सातारा, चिकुर्डे येथे निवास झाला. गंगाखेड, लाेहारा, उस्मानाबाद, परांडा वगैरे भागातच अधिक काळ निवास झाला.
    ४ मार्च १९५९ ला श्री गंगाखेड येथे प्रथम आले. गंगाखेड येथील जहागिरदारांच्या श्रीकृष्ण मंदिरातील सभामंडपाच्या माडीवर स्वतंत्र खाेलीत श्रींचा निवास हाेता. मंदिर श्री गाेदेच्या काठी हाेते. चांगले सुंदर, एकांत, शांत व बंदाेबस्तात असलेले. वरच दिवा, कंदील, बादली, लाेटी व बादलीभर पाणी एवढी व्यवस्था हाेती. फक्त दाेन वेळ स्नानाला व एक वेळ भिक्षेसाठी खाली उतरावे लागे. लाेकांची उपाधी नसल्यासारखीच हाेती. षष्ठीपासून एकादशीपर्यंत मंदिरात मामुली उत्सव असे. त्यावेळी प्रवचने हाेत. नदीवर व भिक्षेस जाण्यास पायर्‍या खूप चढाव्या उतराव्या लागत असत. दूध सकाळ संध्याकाळ मिळण्यासारखे हाेते. पण श्रींनी न घेण्याचेच ठरविले. व दुपारी करपात्र भिक्षा जवळच्या घरी तेवढी घेत असत.
      गंगेला अनेक घाट हाेते. घाटांजवळ गळाभर पाणी हाेते. श्रींनी तेथे वैशाखी क्षाैरापर्यंत मुक्काम करण्याचे ठरविले हाेते. राणीसाहेबांचे व्यवस्थापक, राेज दाेन वेळा येऊन चौकशी करून जात. उन्हाळ्याचा त्रास बराच कमी हाेता व रात्री झोपण्यास आजूबाजूस गच्चीसारख्या जागा हाेत्या.
    पुढे ता. १२ जून ला श्रींचे परांड्यास आगमन झाले व दुसऱ्या दिवशी स्नान उरकून देशमुखांच्या वाड्यात श्रींनी आपले आसन आणले. ताे वाडा पिशाच्चग्रस्त हाेता म्हणून तिकडे काेणी फिरकत नसे. पण श्रींचे वास्तव्य तेथे झाल्यावर मुले बाळे सुद्धा अवेळी येत. पण कुणाला त्रास झाला नाही. कारण श्रींनी त्या पिशाच्यास बाेलते करून कुणास त्रास न देण्याविषयी सक्त ताकीद केली हाेती. श्रींनी ताकीद केल्यावर कधीही कुणाला त्रास झाला नाही.
   
 🌹 सप्तरंगी पाेथी लेखन 🌹
       
        ता. १८ जूनपासून श्रींनी सप्तरंगी पाेथी लेखनास आरंभ केला. लाखी शाई सप्तरंगाची तयार करून त्याने संपूर्ण तुलसी रामायण लिहून काढले. वैशाख शुद्ध १० ( शके १८८१) ला लेखनास प्रारंभ करून ज्येष्ठ शुद्ध दशमीस लेखन पूर्ण केले. ही पाेथी श्रींनी समाधी घेतल्यावर त्यांच्या आज्ञेवरून सज्जनगड येथे देण्यात आली आहे!
 
🌹 श्री शिवपार्थिव लिंगार्चन 🌹

       यावर्षी श्रींच्या प्रेरणेने श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून सामुदायिक श्री शिवपार्थिव लिंगार्चन परांडा येथे सुरू झाले. ११ पुरूष आणि २१ स्त्रियांनी भाग घेतला हाेता. प्रत्येक जण १२१ लिंगे करीत असे. पूजा सांगण्यास ब्राम्हण असे. याप्रमाणे संपूर्ण श्रावण महिना मोठ्या आनंदात गेला. एकूण लिंगार्चन १,३९,०३९ इतके झाले. लिंगार्चन समाप्ती फार मोठ्या प्रमाणावर झाली.
   समाप्तीच्या दिवशी श्री स्वामी शिवपूजनाच्या पूर्वीच एका मोठ्या काेनाड्यात चाैरंगावर व्याघ्राजिनावर बसले हाेते. प्राणप्रतिष्ठा मंत्र सुरू हाेताच, एका निमिषांत श्रींच्या ठिकाणी श्री शिवाचा जाेरात पण प्रशांत शिवरूपाने संचार अगदी स्थाणू असा झाला. फक्त नेत्रात हालचाल हाेती. विसर्जन मंत्र म्हणताच निमिषार्धांत श्रींचे शरीर माेकळे झाले. मात्र तत्पूर्वी हात एकदम वर हाेऊन सर्वत्र फिरला. दुपारी १।। वाजता श्री तेथून परत मठीत गेले. मग परत स्नान व फराळ वगैरे झाले.
    अनेकांना लिंगार्चनात प्रत्यक्ष शिवजी लिंगावर येऊन बसून पूजा घेत आहेत किंवा मध्य लिंगावर श्री सद्गुरू व इतर लिंगावर शिवजी असा अनुभव आला. धन्य गुरूकृपा!
 
लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी