परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे संक्षिप्त चरित्र
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी हे आपल्या प्राचीन सनातन वैदिक हिंदू संस्कृतीतील एक अद्भुत विभूतीमत्व एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. यांनी संपूर्ण गोस्वामी तुलसीदास रचित 'श्रीरामचरितमानस' या रामायणग्रंथाचा समवृत्त-समछंद अनुवाद करून त्यावर विस्तृत टीका लिहिली. म्हणूनच श्रीस्वामी 'महाराष्ट्राचे तुलसीदास' या नावाने विख्यात आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे कर्ममार्गाचे आचरण आणि तितक्याच उच्चप्रतीची निष्ठावंत, निष्काम श्रीरामभक्ती आपल्याला श्रीस्वामींच्या जीवनात पहावयास मिळते. आपला प्रपंच नेटका करून परमार्थातील अत्युच्च शिखर कसे गाठावे याचा वस्तुपाठ म्हणजेच श्रीस्वामींचे चरित्र होय.
पूर्ववृत्तांत
श्रीस्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव श्री. दत्तात्रय नारायण कर्वे. मूळस्थान मुक्काम गिम्हवणे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. गार्ग्य गोत्र कोकणस्थी ब्राह्मण. श्रीहरिहेश्वर व श्रीजोगेश्वरी ही यांची कुलदैवते. श्री. नारायणराव म्हणजे श्रींचे वडील हे शिक्षक होते, धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना संतवाङ्मयाची अत्यंत गोडी होती. यांचा द्वितीय विवाह माहिम येथील श्री. पेंडसे यांची कन्या गंगाबाई यांच्याशी झाला. सौ. गंगाबाई अत्यंत प्रेमळ, सात्त्विक व पतिपरायण होत्या.
जन्म
दि. १५ मे इ. स. १८९३, वैशाख वद्य आमावस्या, सोमवारी सौ. गंगाबाईंच्या माहेरी ( माहिम, ता. पालघर) येथे श्रींचा जन्म झाला. यावेळी श्रींचे मातामह (आईचे वडील- आजोबा) मुलाच्या नाळवारेसाठी खड्डा खणत असताना त्यांना धनाचा कुंभ सापडला.
बालपण व शिक्षण
बालपणापासून श्रीस्वामी अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, एकपाठी व आपला निश्चय कसोशीने पाळणारे होते. वयाच्या पंधराव्या वर्षी मराठी सातवी उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन इ. स. १९१३ मध्ये मुरूड-जंजिरा येथून मॅट्रिक पास झाले. इ. स. १९१८ मध्ये श्री संस्कृत हा मुख्य विषय घेऊन बडोद्याहून बी.ए. झाले.
विवाह
श्रींचा विवाह इ. स. १९१५ मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षात असताना मुक्काम टिटवाळा, ता. कल्याण येथे चौकचे श्री. श्रीधर रामचंद्र जोशी यांच्या कन्या 'द्वारका' यांच्याशी त्यांच्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध झाला. विवाहसमयी श्रीसमर्थ रामदासस्वामींप्रमाणे पळून जाण्याचा विचार आला होता;परंतु त्यांच्या वडिलांचे स्नेही श्री. गोपाळबुवा गणू पाटिल(रा. आन्हे, पो. पडघे, जि. ठाणे) यांनी मुखावरून जाणून शपथ घालून विचारल्यामुळे सांगावा लागला व पुढे प्रारब्धास शरण म्हणून श्री विवाहास तयार झाले.
नोकरी
पुढे इ. स. १९२४ मध्ये श्रींनी एस. टी. सी. ची परिक्षा दिली. पदवीधर झाल्यानंतर मामलेदाराची नोकरी सहजासहजी मिळत असूनही तत्त्वाविरूद्ध म्हणून स्वीकारली नाही तसेच सरकारी नोकरी तर करायचीच नाही, असा त्या काळास अनुसरून दृढनिश्चय केला होता.
इ. स. १९१७ मध्ये मिशनरी हायस्कूल, मुरबाड, जि. ठाणे येथे, पुढील वर्षी वसई हायस्कूलमध्ये सहा महिने, इ. स. १९२० मध्ये डहाणू येथे हायस्कूलमध्ये हेडमास्तर, इ. स. १९२१ मध्ये चिंचणी तारापूर येथे 'कांजी थरमसी हायस्कूल' येथे १६ वर्षे नोकरी केली. ते शाळेत संस्कृत, गणित, इंग्रजी हे विषय शिकवत.
सद्गुरूकृपा,रामनाम मिळाले
इ.स.१९२९ मध्ये श्री श्रीधरस्वामी बिडवाडीकर उर्फ रावजीबुवा या सत्पुरूषाची गाठ पडली व त्यांच्या दर्शनाने, संगतीने पूर्वजन्मीचे संस्कार उफाळून येऊन विषयी वैराग्य व मुमुक्षुत्व प्राप्त झाले. दि. १९ मार्च इ. स. १९३० ला चिंचणीहून श्रींनी श्रीरावजीबुवा यास विनंतीवजा पत्र लिहिले -
जयजयाजी गुरूनाथा।
दास ठेवितो पदी माथा।
विनंती आयकावी आता।
दयाघना श्रीधरा। ।
परिणामे इ. स. १९३० साली श्रीरावजीबुवांकडून त्यांच्या लालबाग येथील मठात त्रयोदशाक्षरी मंत्र मिळाला. नंतर भक्तीज्ञानासंबंधी अधिक मार्गदर्शन व्हावे अशी विनंती सद्गुरूंस केली असता 'आधी साडेतीन कोटी जप करून ये, मग पुढचा मार्ग सांगेन' अशी आज्ञा झाली. व त्याप्रमाणे श्रींची साधना सुरू झाली.
उपासनासदृश दिनचर्या
पहाटे ४ वाजता उठून गार पाण्याने प्रातःस्नान वगैरे आवरून सूर्योदयापूर्वीच संध्या, गायत्रीजप, ब्रम्हयज्ञ, इष्टदेवतेचा जप करत. नित्य गीतापाठ, पूजा-अर्चा करून शाळेत जात. मधल्या सुट्टीत घरी येऊन हात-पाय धुवून जप करून पुन्हा वेळेवर शाळा गाठत. काही दिवसांनी घरी राहून मनासारखे साधन होत नाही म्हणून इ. स. १९३२ साली चैत्र शुद्ध प्रतिपदेस घराशेजारीच स्वतंत्र झोपडी बांधून फक्त अग्निस्पृष्ट फराळाचे पदार्थ भक्षण करून ब्रम्हचर्ययुक्त मंत्रपुरश्चरण सुरू केले. संध्याकाळी शाळेतून आल्यावर पुन्हा स्नान करून मंत्रानुष्ठानास बसत ते ठराविक संख्या पूर्ण होईपर्यंत झोपत नसत. क्वचित झोप येऊ लागली तर शेंडी खुंटीस बांधून ठेवत म्हणजे डुलकी आलीच तर हिसका बसून जाग येई.
मंत्रपुरश्चरणाची पूर्तता
याप्रमाणे दरवर्षी १.५ कोटी जप करून ३ वर्षात ४.५ कोटी जप पूर्ण करून पुढील मार्गदर्शनासाठी श्रीगुरूंच्या दर्शनास गेले असता 'राम तुला सर्व सांगेल' असा आशीर्वाद मिळाला व त्याप्रमाणे रामरायाने सर्व काही सांगून कृतःकृत्य केले.
साधनसिद्ध तीर्थयात्रा
इ. स. १९३३ साली मे महिन्याच्या सुट्टीत एकट्याने फराळावर राहून कुंभमेळा, मथुरा, वृंदावन, गोकुळ, हरिद्वार, ऋषीकेश, स्वर्गाश्रम, आयोध्या, प्रयाग, काशी, गया असा प्रवास नित्यक्रमात खंड न पडू देता केला. आधीच आगगाडीचे वेळापत्रक पाहून सूर्योदय-सूर्यास्त पाहून, कुठे कुठला थांबा आहे, कुठे किती वेळ गाडी थांबते, त्या वेळेत प्रातःस्नान, सायंस्नान व संध्या करून वेळेवर गाडी गाठत. यामध्ये हरिद्वारहून आयोध्येस जाताना व दि. २८-१ इ. स. १९५९ ला मुंबईहून परंड्यास येताना केवळ दोन वेळा प्रातःस्नान प्रवासात असल्यामुळे चुकले. इ. स. १९३३ ते इ. स. १९५९ यामध्ये व इ. स. १९५९ नंतर पुढे महासमाधीपर्यंत कधीही नियमात खंड पडला नाही.
बाबा गंगादास यांच्याकडून ब्रम्हज्ञानाचा उपदेश व जीवनमुक्तता
बाबा गंगादास हे महान भगवद्भक्त, अत्यंत प्रेमळ संत चिंचणी-तारापूरच्या किल्ल्यावर राहत. इ. स. १९३० पासून यांच्या संगतीने श्रींना श्रीरामचरितमानसाची गोडी लागली व त्याचे रहस्य प्राप्त झाले. बाबा गंगादासांचे त्यांच्या बाबूंवर (अर्थात श्रीस्वामींवर) खूप प्रेम होते. ते स्वामींना प्रेमाने 'बाबू' म्हणत.
दि. २७-१ इ. स. १९३४ रोजी काही निमित्ताने श्री बाबा गंगादासांकडेच मुक्कामाला राहिले होते. मध्यरात्रीच्या शिवपूजेनंतर परमप्रसन्न असलेले बाबा श्रींना म्हणाले, 'बाबू जल्दी आ जा! अब ज्ञानका रहस्य एकही बात में कहूॅंगा। तेरी लायकात हो तो परचीती मिल जाएगी देख! जैसे हो वैसे रहना, कुछ बनना नही।' हे वाक्य ऐकताच श्रींच्या हृदयात वेदांत-गीता आदिंच्या उपदेशाचा लख्ख प्रकाश पडला व परमानंदमय दशा प्राप्त झाली. याचवेळी 'श्रीतुलसीदासजी तेरे मुखसे बोलेंगे' असाही आशीर्वाद दिला.
नंतर परत दि. २८-१ इ. स. १९३४ रोजी दुपारी १.३० वाजता तशीच स्थिती प्राप्त झाली व या दिवसापासून खरी निर्भयता प्राप्त झाली.
उर्वरित गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रमातील साधना
इ. स. १९२३ मध्ये श्रींना प्रथम आपत्य झाले होते. त्यानंतर इ. स. १९३५ मध्ये दुसरा मुलगा झाला व गेला. यावेळी शाळेतील सहकार्यांना पेढे वाटत असताना श्री दोन पेढे सहकार्यांच्या हातावर ठेवत होते. काहींनी दोन पेढे कशाचे असे विचारले असता, 'हा पेढा मुलगा झाल्याबद्दल आणि हा दुसरा पेढा तो गेल्याबद्दल' असे निर्विकारपणे सांगितले. यानंतर इ. स. १९३५ सालीच सौभाग्यवतींना ( सौ. कमलाबाई कर्वे अर्थात् द्वारकाताई) दीक्षा दिली.
इ. स. १९३७-३८ मध्ये श्रीस्वामी चौक, जिल्हा कुलाबा येथे धन्येश्वराच्या पडवीत एकांतवासात राहण्यास आले. यावेळी पत्नीस त्यांच्या बंधुकडे चौकला ठेवले होते. येथे २-३ वर्षे मुक्काम होता. येथे श्रींनी संपूर्ण श्रीरामचरितमानस ९ महिन्यांत सांगितले. यानंतर नर्मदातटाकी निबिड, घनदाट अशा घोर अरण्यात अहिल्यादेवींनी बांधलेल्या कोटेश्वर मंदिरात ११ दिवस राहून अनुष्ठान केले. अनुष्ठान चालू असताना भगवान शंकरांनी वृद्ध ब्राम्हणाच्या रूपात तर अनुष्ठान समाप्तीनंतर प्रत्यक्ष भगवान प्रभु श्रीरामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी तेजस्वी सगुण रूपात दर्शन दिले. यानंतर खेड, जि. पुणे येथील केदारेश्वर मंदिरात राहून इ. स. १९४१-१९४२ मध्ये २१ महिन्यात २४ लक्ष गायत्रीचे पुरश्चरण पूर्ण केले. येथेही तुलसीरामायणावर प्रवचने होत. येथे ९ महिन्यांत केवळ बालकांडच सांगून झाले.
यानंतर श्रींनी चतुर्थाश्रम घेण्याचे ठरविले व त्यासाठी सौंना पत्र लिहिले की, चतुर्थाश्रम घेण्याचा विचार आहे;पण त्यास आपली संमती हवी. अन्यथा अग्निहोत्र ठेऊन वानप्रस्थाश्रम ठेऊन राहता येईल. हे मान्य असल्यास हे पत्र पोहोचल्यापासून १५ दिवसांत तुम्ही खेड येथे येऊन हजर व्हावे. याप्रमाणे १५ दिवस वाट पाहिली जाईल. तसे न झाल्यास चतुर्थाश्रम स्वीकारण्यास आपली संमती आहे असे समजून संन्यासग्रहण केला जाईल. यावर काहीच पत्रोत्तर न आल्याने ता. १८-१ इ. स. १९४३ रोजी, टिळक पंचांगाप्रमाणे पौष शुद्ध द्वादशीस त्यांच्या कुंडलीप्रमाणे स्थिरलग्नी स्थिरनवांशात खेड जि. पुणे येथे संन्यासाश्रम स्वीकारला. यापूर्वीच पत्नीच्या नावे जमीन करून देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच त्या इ. स. १९३७ पासून त्यांच्या बंधूकडे चौक, जि. कुलाबा येथे वास्तव्यास होत्या.
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामींकडून दंडग्रहण
परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती ( पोटे) स्वामी महाराजांबद्दल श्रींना दागिने, पैसे मागतात, संग्रह करतात, इ. परस्परविरूद्ध पुष्कळ माहिती कळली होती. पण तरीही ते श्रोत्रिय, ब्रम्हविद्, वरिष्ठ आहेत व पूर्ण समाधान होण्यासाठी त्यांच्या पायावर शिष्य भावाने डोके ठेवणे गरजेचे आहे अशी श्रींना अंतःस्फूर्ती होऊन बळावू लागली. त्याप्रमाणे श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडे म्हणजेच पोटे स्वामी अर्थात् आळ्याचे महाराजांकडे (आळे हे ता. जुन्नर, जि. पुणे मधील एका गावाचे नाव आहे.) जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे दि. १२-२ इ. स. १९४३ म्हणजेच माघ शुद्ध १०, शा.श.१८६४, रविवारी दुपारी १२ च्या सुमारास श्रीआळ्याच्या महाराजांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचले. श्रीमहाराजांचे दिव्य ब्राम्हतेज, प्रसन्ना मूर्ती पहाताक्षणी श्रींना परमसमाधान झाले. त्यावेळी श्रीमहाराज भिक्षा ग्रहण करीत असल्यामुळे श्री उभे राहिले. तेव्हा कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नसतानाही श्रीमहाराजांनी श्रींना पूर्वाश्रमीच्या आडनावावरून संस्कृतमध्ये क्षेम-कुशल विचारले. श्रीआळ्याच्या महाराजांची भिक्षा झाल्यावर श्रींनी यथाविधी पुढील श्लोक म्हणून वंदन केले.
यद्पादपङ्कजपरागपवित्रमौलि।
भूयो न पश्यति नरो जठरे जनन्या।
तं वासुदेवमजमीशमनंतबोधम्।
श्रीमद्गुरूं शरणदं शरणं प्रपद्ये।।
त्याच दिवशी सायंकाळी योगपट्ट विधीही उरकला. याचे वर्णन श्रींनी पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे-
माघ शुद्ध दशमी मृग भानुवार ।
केला अंगीकार वासुदेवे ।।
योगपट्टदीक्षा देऊनी दासाशी ।
गुरुपरंपरा सांगितली ।।
वासुदेवानंद,त्रीविक्रमानंद ।
नृसिंहानंद , वासुदेवानंद ।।
यतीसांप्रदाय सरस्वती नामे ।
प्रज्ञानानंद अभिधान ।।
दुधाहारी मठ,भोसल्यांचा घाट ।
वाराणसी क्षेत्र पुण्यभूमी ।।
महावाक्य पंचीकरण तत्वबोध ।
करुनिया गुज निरोपिले ।।
शिरी पद्महस्त ठेउनिया मम ।
मज आप्तकाम गुरूने केले ।।
तेंव्हा कृतकृत्य झालो याची देही ।
ठेउनिया शीर गुरुपायी ।।
अजन्म्याचा आता जन्मची चुकला ।
सनातना प्राप्ती अमरत्व ।।
जगामाजी आता माझा मी भरलो ।
मजमाजी सर्व जग तैसे ।।
मजहूनी आता जग भिन्न नसे ।
जे जे दिसे भासे गुरुरूप ।।
{ इ. स. १९४३, आळे मुक्काम , ता. जुन्नर जि.पुणेे माघ शुद्ध दशमी शा. श. १८६४ }
नामकरणाच्या वेळी श्रींनी श्रीमहाराजांना त्रिवार विनंती केली की, 'रामानंद' किंवा 'राघवानंद' नाव ठेवल्यास सहज नामस्मरण होईल;पण श्रीमहाराजांनी निक्षून सांगितले की 'प्रज्ञानानंद' ठेवायचे आहे व तेच ठेवले गेले.
इ. स. १९४३ पूर्वीच श्रीआळ्याच्या महाराजांना अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्याने डावे अंग निरूपयोगी झाले होते. तसेच मधुमेहाचा विकारही तीव्र होता. उठता-बसताही येत नव्हते. त्यामुळे सर्व शरीरसुलभ क्रिया जागीच होत व सदा अवधूत स्थितीतच असत. परातीत उचलून ठेऊन स्नान घालावे लागे. मांड्या वगैरे भागांवर तळहाताएवढी फाफरे पडत. त्यांना मुंग्या डसत. पण श्रीमहाराज एकही आवाक् काढत नसत. ते श्रींना पहावेना. तेव्हा एकदा श्रींनीच विनंती केली, 'आपले सर्व रोग व पीडा या दासास द्यावेत. आपल्या कृपेने या स्वामीच्या देहास ती उपाधी फार काळ घ्यावी लागणार नाही.' यावर श्रीमहाराज म्हणाले, 'मी देऊ शकेन व आपण घेऊ शकाल हे अगदी खरे;पण ज्याने केले त्यानेच भोगणे येग्य होय.फार त्रास होतो आहे असे मनास वाटताच प्राण ब्रह्मरंध्रात चढविताच कष्ट मुळीच नाहीत'. यावरून श्रीमहाराजांचा योगाभ्यास उत्तम होता हे श्रींना समजले. इ.स.१९४३ चा चातुर्मास खेड येथे झाला. एके दिवशी अचानक आदिशक्ती जगदंबेचे साक्षात् दर्शन झाले. कार्तिक श. ४ व ५ शा. श. १८६५ या दोन दिवसांत श्रीस्कंदपुराणातील गुरूगीतेवर 'श्रीगुरूगीता प्रबोधिनी' ही प्राकृत टीका लिहून श्रीआळ्याच्या महाराजांना समर्पित केली. नंतर श्रीस्वामी चासकमान, ता. खेड येथे दीर्घकाळ राहिले.
श्रीरामचरितमानसाचा मराठी अनुवाद श्रीगुरूचरणी अर्पण केला.
वरचेवर श्रीस्वामींना अनिवार काव्यस्फूर्ती होऊ लागली.
सांगतसे मज तो रघुराणा। मम आज्ञा ऐके प्रज्ञाना। सत्वर करण्या घे तूं हातीं। रामचरित मानस रचना ती।। १।।
अशी प्रत्यक्ष श्रीरामाज्ञाच झाल्याने श्रावण शुद्ध द्वितीया शा. श. १८६७ अर्थात् दि.१०-८ इ. स. १९४५, गुरूवार रोजी श्रीगोस्वामी तुलसीदास विरचित श्रीरामचरितमानसाचा ( दोहा, चौपाया, सोरठा, छंद, इत्यादि मूळाप्रमाणे तंतोतंत) समवृत्त-समच्छंद मराठी अनुवाद अवघ्या तीन महिन्यांच्या आतच लिहून पूर्ण झाला. लगेचच श्रीआळ्याच्या महाराजांना पत्र लिहून कळविले व दर्शनाविषयी अनुज्ञा मागितली व अनुज्ञा मिळाल्याने जाणे झाले. श्रीस्वामी श्रीमहाराजांना मराठी रामचरितमानस वाचवून दाखवू लागले. ते जसजसे वाचू लागले तसतसे श्रीमहाराजांना अश्रू अनावर होऊ लागले. अनेकदा तर ते अक्षरशः हुंदके देऊन धाय मोकलून भावविभोर होत. इकडे श्रींचाही कंठ दाटून येई, नयनी अश्रू येत असत. शेवटी मध्येमध्ये थांबत थाबंत महत्प्रयासाने अनुवाद पूर्ण करून श्रीमहाराजांना अभिप्राय व आशीर्वाद मागितला. तेव्हा असा असा लिहून आणा म्हणून आज्ञा झाली व त्याप्रमाणे लिहून आणल्यावर खाली श्रीमहाराजांनी सही केली. तो अभिप्राय व आशीर्वाद असा-
धन्योsसि कृतकृत्योsसि पावितं स्वकुलं त्वया।
अन्तः संतोषमापन्ना श्रुत्वा रामायणं वयम् ।।१।।
साकी :
तुलसीदासकृत-काव्य कुसुमगत् मधुपः प्रज्ञानोsयम् रामरचित मधु निजभाषायामर्पितवानस्मभ्यः ।।२।।
इदं रामायणं काव्यं जनानां सौख्यदायकम् ।
प्रीतिपात्रं भवेल्लोके शाश्वतं कीर्तिवर्धनम् ।।३।।
भुक्तिं भक्तिं च कैवल्यं ज्ञानं वैराग्यमेव च ।सेवनादचिरान्नित्यं दास्यत्येष वरो मम ।।४।।
एकदा आळे मुक्कामी दि. २ ते ४ सप्टेंबर इ. स. १९४६ रोजी 'भार्गव-दर्प-विमर्दन' व दि. ७ सप्टेंबर इ. स. १९४६ रोजी 'हिराबाई' अशी दोन कीर्तनोपयोगी आख्याने लिहिली गेली. दि. १२ एप्रिल इ. स. १९४७ रोजी श्रीरामचंद्राचे बालरूपात दर्शन झाले. त्यावेळी 'बालरूप रामचंद्र पूर्ण उगवला' हे काव्य झाले. दि. १५-४ इ. स. १९४७ रोजी श्रीमहालक्ष्मीचे साक्षात् दर्शन झाले. या महिन्यात श्रीरामस्तोत्र, भोजनविधि, संतासंत संगति, श्रीराम प्रातःस्मरण, वगैरे अनेक स्फुट काव्ये झाली. दि. २८-४ इ. स. १९४७ ला श्रींनी केलेली अनेक नवीन वृत्ते संकलित केली गेली. इ. स. १९५३ मध्ये श्रींचा 'वेदांत-सार-अभंग-रामायण' तसेच 'अभिनव-रामायण' हा स्फुटकाव्याचा संग्रह प्रसिद्ध झाला.
वृत्ती अत्यंत प्रेमळ, निस्पृह, अत्यंत प्रसिद्धीपराङ्मुख. आपले नाव व्हावे या हेतूने चुकूनही श्रींच्या हातून काही घडत नसे. सत्यभाषणावर अत्यंत कटाक्ष. शिस्त व नियमितपणा यांची आवड. कुणी बेशिस्त वागलेले, थट्टेतही खोटे बोललेले, दिलेला शब्द न पाळलेले खपत नसे. लगेच त्याची निर्भिडपणे हजरी घेतली जायची. यामुळे एक प्रकारचा दरारा सर्वांनाच वाटे. पण चूक झाली व प्रामाणिकपणे कबूल केली तर लगेचच क्षमा केली जाई. दांभिकपणाची मात्र अत्यंत चीड होती.
श्रीस्वामींची प्रखर राष्ट्रभक्ती
इ. स. १९४६ मध्ये 'चले जाव' आंदोलन चालू होते. हैद्राबादेत रझाकाराचे अत्याचार चालू होते. या काळात पूर्वीचे रामदासी संप्रदायाचे संस्कार उफाळून येऊन 'अहो हिंदूंनो, संघ संपन्न व्हावे', 'हिंदूंनो डोळे उघडा', 'दूर करी शीघ्र जाच हा', 'श्रीसमर्थ प्रार्थनाष्टक' अशी काव्ये झाली. ती तत्कालीन 'केसरी'सारख्या वृत्तपत्रांतून प्रसिद्धही झाली. कुंडल, संस्थान औंध जवळ वीराण्णाच्या डोंगरावर ब्रम्हानंद महाराजांचे आज्ञेने ३९ दिवसांत राष्ट्रोन्नतीसाठी १ कोटी ७५ लक्ष ६ हजार प्रणवजपानुष्ठान केले. (श्रीब्रम्हानंदमहाराजांनी १ कोटीच सांगितले होते.)
पुढे चासकमानला चातुर्मास करून श्रीस्वामी परंडा, जि. उस्मानाबाद - धाराशिव येथे आले तेव्हा रझाकार चळवळीचा जोर होता. तेव्हा श्रींनी सांगितले, जर रझाकारांचा हल्ला झाला, स्त्रीयांची बेअब्रू, विटंबना होण्याचा प्रसंग आला तर हा स्वामी संन्यासी असला तरी हातात तलवार घेऊन प्राणपणाने रझाकारांशी मुकाबला करून तुमचे संरक्षण करील. तसेच सर्व जनतेस सुख लाभावे म्हणून श्रीस्वामींनी काही काळ अनुष्ठान केले. ते होताच वातावरण शांत झाले.
इ. स.१९५० मध्ये 'मानसमणि' या रामचरितमानसावरील लेखनासच अग्रक्रम देणार्या हिंदी मासिकाचे व नोव्हेंबर इ. स. १९५१ मध्ये 'मानसपीयूष' चे श्रीस्वामी ग्राहक झाले. त्यासाठी संपादकाला लिहिलेल्या पत्राने संपादकच इतके प्रभावित झाले की, 'परशुरामप्रसंगावर भाव लिहून पाठवावे' असे इ. स. १९५२ मध्ये त्यांचे श्रींनाच पत्र आले. 'मानसपीयूष' मधील टीकेमुळे श्रींचे नाव उत्तरभारतातील मानसप्रेमी जनांना सुपरिचित झाले व श्रींच्या दर्शनाविषयी उत्कंठा प्राप्त होऊन 'रामवन' सतना येथून इ. स. १९५३ मध्ये चैत्रात रामनवरात्रात होणार्या 'मानसयज्ञा'साठी आग्रहाचे आमंत्रण आले. त्यासाठी श्रींनी चास-कमानहून पुण्यास येऊन दि. ११ मार्च इ. स. १९५३,बुधवार रोजी 'रामवन' येथे प्रयाण केली. रामवन येथे रोज संध्याकाळी ५ वाजता श्रींचे हिंंदीमधून रामायणावर प्रवचन होई. त्यांचे ते तेज, मानसावरील प्रभुत्व पाहून उत्तरभारतीय थक्क होऊन गेले व श्रींच्या चरणी नतमस्तक झाले. यानंतर श्रीस्वामी जबलपूर, गोंदियास जाऊन चासकमान ला आले. यावर्षी श्रींना ६० वर्षे पूर्ण झाल्याने साठीशांतीनिमित्त सद्भक्तांचा मेळावा भरवला होता. यानंतर श्री दि. १९ सप्टेंबर इ. स. १९५४ ते १ जुलै इ. स. १९५५ पर्यंत इस्लामपूरला होते.
ज्या विस्तृत टीकेच्या लेखनाचा प्रारंभ कार्तिक शुद्ध प्रतिपदा शा. श. १८७५ मध्ये इस्लामपूर येथे झाला होता, ती परिशिष्ट लेखनासह श्रावण कृष्ण पंचमी शा. श. १८७७ अर्थात् सोमवार, दि. ८-८ इ. स. १९५५ रोजी सातारा येथे लिहून पूर्ण झाली. ही टीका डेमी आकाराची छापील पृष्ठे ६१०० होतील एवढी विस्तृत आहे. यानंतर इ. स. १९५६ चा चातुर्मास सांगली येथील विष्णुमंदिरात, इ. स. १९५७ चा चातुर्मास इस्लामपूरला डाॅ. वैद्य यांच्या जुन्या वाड्यात स्वतंत्र जागेत, इ. स. १९५८ चा चातुर्मास माधवनगर येथे श्री. नातूशेठ यांच्या बंगल्यात संपन्न झाला.
यानंतर इ. स. १९५९ साली श्रींचा मुक्काम परंड्यास गेल्यानंतर समाधिकाळापर्यंतचे जास्तीत जास्त वास्तव्य परंड्यासच झाले.
सप्टेंबर इ. स. १९५९ मध्ये रामवन (सतना, मध्यप्रदेश) येथे 'श्रीप्रज्ञानानंद पेटिका' स्थापन होऊन त्यात रामचरितमानस(मराठी), गूढार्थ चंद्रिका नमुना अंक, प्रस्तावना खंड, मानसमणितील श्रींचे सर्व छापील लेख व श्रींचा पत्रव्यवहार वगैरे पेटिकेत ठेवून श्रींचा अद्भुत सत्कार व अद्वितीय गौरव करण्यात आला. इ. स. १९५९ ते इ. स. १९६२ या चारही वर्षाचे चातुर्मास परंड्यासच झाले. इ. स. १९६३ चा चातुर्मास लोहार्यास व इ. स. १९६४ चा चातुर्मास उस्मानाबादेस गरड वकिलांच्या वाड्यात माडीवर झाला. इ. स. १९६५-६६ सालचे चातुर्मास परंडा येथेच रामविश्रामधामात तर इ. स. १९६७ चा चातुर्मास लातूर येथे श्रीराम मंदिराच्या पडवीत झाला. हा श्रींचा २५ वा चातुर्मास होता. व हाच शेवटचा ठरला. इ. स १९६६ पासूनच प्रायोपवेशनाने देहत्याग करण्याचा श्रींच्या मनातील विचार बळावतच गेला व 'परंडा येथेच फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून प्रायोपवेशनाने देह ठेवण्याचे ठरविले आहे. तरी पौर्णिमेपर्यंत दर्शनास यावयाचे असेल त्यांनी यावे' अशी पत्रे शिष्यमंडळींकडे तसेच प. पू. श्रीगुळवणी महाराज, प. प. भगवान श्रीधरस्वामी महाराज यांनाही पाठवली गेली. पू. गुळवणी महाराज तसेच प. प. भगवान श्रीधरस्वामी महाराज तसेच इतरही अनेक विद्वज्जन-सत्पुरूषांची पत्रे आली की, आपण उपोषण करू नये;पण प्रत्यक्ष श्रीरामरायाने सांगितले तरच हा विचार रद्द करू, असे श्रींनी कळविले.सर्व गोष्टींची तयारी अगदी एखाद्या कार्यक्रमाप्रमाणे श्रीस्वामी करत होते. सुतळीचा तोडा, रद्दी, उरलेली शाई, इत्यादि प्रत्येक बारीक-सारीक वस्तूसुद्धा कोणास प्रसाद म्हणून द्यायची ही सर्वही मृत्युपत्र - व्यवस्था लिहून ठेवली होती. देह एखाद्या नदीत सोडून द्यावा किंवा चार तुकडे करून जंगलात टाकून द्यावा असे श्रीस्वामी म्हणत. समाधी बांधण्यास विरोध होता;पण नंतर सर्वांनी अनेकदा विनंती
केल्यावरून मान्य केले.
होळी पौर्णिमेचा दिवस अन्न न घेता केवळ पाण्यावरच काढला व दुसर्या दिवशीपासून - फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून प्रायोपवेशन सुरू केले.
रामविश्रामधामांत गर्दी होईल म्हणून श्री. वासुदेवराव
(नानासाहेब) देशमुख यांच्या वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिकडेच सर्व सोय केली गेली. पहिल्याच दिवसापासून हजारो लोक दर्शनास येऊ लागले. श्रींनी पहिले सात दिवस सारखे लोकांशी बोलणे सुरूच ठेवले होते.अन्नपाण्याचे तर नावसुद्धा नाही! बोलणे तर सुरू! पुढे लघवी रक्तासारखी लाल होऊ लागली. जिभेवर सर्वत्र भेगा पडल्या, फोड आले;पण श्री अत्यंत निर्विकार असत. 'आपण बोलू नका' अशी कुणी विनंती केल्यास 'जाऊ दे, आता हे मडके लवकरच फुटणार आहे' असे म्हणत.
'नाथषष्ठीस देह सोडू' असे श्रीस्वामी पूर्वी म्हणाले होते. त्यामुळे नाथषष्ठीस भक्तगण चिंतेतच होते. श्रींचे नऊ दिवसांचे तुलसीरामायणाचे पारायण चालू होते. दिवसभर रामनामाचा गजर चालायचा. संध्याकाळी ५ वाजण्याचे सुमारास नित्याप्रमाणे श्री स्नानगृहात गेले आणि स्नानास बसताना एकदम कोसळले. असे वाटले की श्री गेलेच. पळापळ सुरू झाली. सोवळ्यातील काही मंडळींनी घोंगडी अंथरली. दर्भ, तुळसी पसरल्या. काहींनी श्रीस्वामींना स्नानगृहातून बाहेर आणले तेव्हा ते थोडे शुद्धीवर आले. त्यामुळे त्यांना घोंगडीऐवजी पलंगावर बसविले. तेव्हा श्रींनी सांगितले, 'घोंगडी काढून टाका, अजून अवकाश आहे.' रात्री ९ च्या सुमारास श्रीस्वामींना थोडे बरे वाटले. त्यावेळी एकाने विचारले, 'जलप्रवेश, पर्वतपतन, प्रायोपवेशन, इत्यादि मार्गाने देहत्याग करणे योग्य आहे का?' त्यावर श्रींनी सांगितले, 'वृद्धयतींनी असा देहत्याग करू नये, पण यतीवृद्धांना असे करण्यास हरकत नाही.'
श्रीसेवेसाठी असणाऱ्या श्री. माधवराव जोशी यांच्या पत्नी सौ. जोशी यांनी श्रींच्या जिभेवर पडलेल्या भेगा पाहून त्यावर मुळी लावताना दोन थेंब पाणी अधिक घातले. त्याचा लेप लावत असताना ते पातळ झाल्याचे श्रींना जाणवले. तेव्हा 'आम्ही अन्नपाणी वर्ज्य केले असताना तू त्या लेपात जास्त पाणी का घातलेस?' असे त्या परिस्थितीतही म्हणाले.
दुसरे दिवशी श्रीतुलसीरामायणाचे वाचन चालू असताना श्रींनी 'आज कोणता योग आहे?' असे विचारले. 'आज परिघ योग आहे' असे सांगितले गेले. तेव्हा 'आज जायचे नाही' असे श्री म्हणाले. नंतर दोन दिवस बोलणे बंदच होते. स्नानादि नियमित होत असे. वेदना फारच झाल्यास 'श्रीराम, श्रीराम' असा उद्घोष करीत. तोही दिवस गेला.
रात्री १ च्या सुमारास श्रींच्या सेवेस असणारे डाॅ. कुलकर्णी यांनी वेळ जवळ आल्याचे जाणून श्रींनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रींच्या छातीवर शाळिग्राम ठेवला. हातपाय गार पडून त्राण नसतानाही श्रींनी तो आपल्या हृदयावर सरकवून घेतला. पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांना गंगाजळ व तुलसीपत्र तीर्थ घातले गेले. यानंतर भजनाचा जयघोष सुरू असताना फाल्गुन वद्य दशमीला रात्री १ वाजून १० मिनिटांनी खाड्कन डोळे उघडले गेले. एकदम वीज चमकल्यासारखे झाले व त्याचवेळी प्राण पंचतत्वात विलीन झाले.
नेत्रांतून प्राण जाणाऱ्यास वैकुंठ प्राप्त होतो असे श्रीस्वामी सांगत व आम्हीही तसेच जाणार असेही म्हणत. याप्रमाणे श्रींनी सांगितल्याप्रमाणेच सर्व काही घडले. दुसरे दिवशी अनेकानेक गावांहून शिष्यमंडळी, भक्तमंडळी अठरा पगड जातींचे लोक त्यांच्या या लाडक्या स्वामींच्या शेवटच्या दर्शनासाठी जमली. जवळजवळ १० हजार लोक त्या अपूर्व रथयात्रेत होते. भर उन्हाळ्यात ५० ब्राम्हण सोवळ्यात अनवाणी पायांनी श्रींचा रथ आनंदाने, प्रेमादराने ओढत होते. भजने, जयजयकार चालूच होता. अशी ही अथांग मिरवणूक दुपारी ४ च्या सुमारास श्रीहंसराजस्वामींच्या मठात आली. श्रींनी पूर्वी जी त्यांची वस्त्रे स्वतः धुवून सोवळ्यात ठेवून सूचना देऊन लिहून ठेवली होती की, शेवटच्या वेळी विशिष्ट ठिकाणी ठेवलेली वस्त्रे वापरावी त्याप्रमाणे तीच वस्त्रे, कटिसूत्र, कौपीन त्यांना नेसवून, पूजा-आरती करून अश्रूपूर्ण नेत्रांनी सर्वांनी निरोप दिला. सारी जनता धाय मोकलून रडली. पण श्रींनी सांगून ठेवले होते की, 'देहरूपाने गेलो तरी चैतन्यरूपाने मी तुमच्याजवळ आहे. तुम्ही कळवळून प्रार्थना करा. मी तुम्हाजवळच आहे.'
।। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वतीस्वामी महाराज की जय।।
।। श्रीबाबागंगादास महाराज की जय।।
।। सद्गुरू श्रीश्रीधर महाराज की जय।।
।। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज की जय।।
।। जय जय रघुवीर समर्थ।।
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
Comments
Post a Comment