प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ५

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ५


●● पहिले विघ्न आप्तांचे ●●

            प्रातःस्नानाचा नियम याच काळात केला गेला.पहाटे 4 ला उठून नित्यकर्म आवरून गार पाण्याने प्रातःस्नान , सूर्योदयापूर्वीच संध्या, गायत्री जप,ब्रह्मयज्ञ व इष्टदेवतेचा जप याप्रमाणे सकाळचा कार्यक्रम असे. शाळेतून मधल्या सुट्टीत येऊन, हातपाय धुवून,वस्त्रे बदलून जप करीत व परत शाळेत जात.  एकही क्षण वाया जाणार नाही यासंबंधी सतत जागरूकता असे. तरीही अखेर वाटले की घरात राहून मनासारखे साधन होत नाही,  उपाधी मागे लागतात. म्हणून यासाठी काय करावे अशी तळमळ लागली होती. या साधनकाळात वेळच्यावेळी स्नानसंध्या वगैरे असे. तसेच दाढीजटाही ठेवल्या होत्या. त्यामुळे सभोवतीची माणसे चेष्टा करीत. त्यांच्या मावशी बडोद्यास होत्या.  त्यांनी तर बडोद्यास गेल्यावर ‘तू मी सांगते त्याप्रमाणे राजमहल रोडवर झाडाखाली नुसता बसून राहा . म्हणजे मी तुला 8-10 दिवसात 1-2 हजार रूपये मिळवून देते.' असे उद्गार काढले. त्यावर ‘  पैसा मिळवण्यासाठी साधन नाही’ असे उत्तर श्रींनी दिले . असे प्रकार जगात चालतात ह्याची जाणीव श्रींना होती. कदाचित मावशीच्या निमित्ताने श्रीरामाने परीक्षा पाहिली असेल अशी श्रींची भावना झाली.  साधना करु लागल्यावर  पहिले विघ्न आपल्या आप्तजनांकडुनच येत असते असे श्री नेहमी म्हणत असत. ‘अरे, गार पाण्याने कशाला आंघोळ करतोस, बाधेल’. अशा त-हेने अगदी प्राणपणानेही सूचना येते. पण यावेळीच मनाचा दृढ निश्चय करुन या मोहाचा त्याग केला पाहिजे व झडझडून साधन केले पाहिजे. एखादाच नियम करावा पण तो कसोशीने पाळावा असे ते म्हणत व त्यांचे सांगणे नेहमी ‘आधी केले मग सांगितले’असेच असे.

 ●● नाम सप्ताहाचा प्रभाव ●●

            एकीकडे अशा रीतीचे आत्मोन्नतीसाठी खडतर अनुष्ठान आरंभिले होते.  तरी पण व्यवहारिक कर्तव्यात कधीच कसूर केली नाही. केवळ कौटुंबिकच नव्हे तर सामाजिक बाबतींतही त्यातल्या त्यात सवड काढून  जे शक्य असेल ते कार्य हाती घेतले जाई. 1931मध्ये दोन महिने चिंचणी  गावात चोरांचा सुळसुळाट झाला होता. हा त्रास बंद होण्यासाठी श्रीरामाज्ञेने श्रावणात नारळी पौर्णिमेनंतर नारायणाच्या मंदिरात ‘ रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम' या एका मंत्रानेच नामसप्ताह चालू केला होता. तिस-या दिवसापासूनच चोरांचा त्रास बंद झाला. दोन दोन  तासांचा पहारा ठेवला होता. प्रत्येक पहा-यात निदान चार व्यक्ती असत. टाळ फक्त असत. विणा नव्हती.  श्रावण वद्य आष्टमीस सप्ताहाची समाप्ती झाली.यावेळी भजनीमंडळाचे आभार प्रदर्शनपर प्रार्थना म्हणताना श्रींचा कंठ भरुन येऊन नेत्रांतून अश्रुधारा वाहात होत्या. म्हणवेना, शेवटी महत्प्रयासाने प्रार्थना पुरी केली.

          त्याचप्रमाणे श्रीनागेश्वर ,पूर्वी शांत रम्य स्थान होते,  पण या सुमारास जीर्ण झाले होते, कधी भूमीस येईल व कोणाच्या डोक्यावर पडेल याचा नेम नाही अशी स्थिति पाहून, त्याच्या जीर्णोद्धारासाठी श्रींनी सर्व ग्रामस्थांची प्रार्थना केली आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करवून घेतला.               

●● ब्रम्हचर्ययुक्त मंत्रपुरश्चरण  ●●

         या प्रकारे साधना चालू असतानाच ‘3।। कोटी जप करुन ये मग पुढील मार्ग सांगेन’ हे सद्गुरूंचे वचन मनात सारखे घोळत राहिले होते. त्यामुळे 1932 साली चैत्र शुद्ध प्रतिपदेस चिंचणीला घराशेजारीच स्वतंत्र झोपडी बांधून अग्निस्पृष्ट फराळाचे पदार्थ फक्त भक्षण करुन, ब्रह्मचर्ययुक्त मंत्रपुरश्चरण श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे सुरू केले. रोज साधारण 40 ते 50 हजार जपसंख्या पूरी होई. नोकरी सांभाळून हे सर्व केले जाई. पहाटे 4 ला उठून नित्यक्रम आवरून, स्नानसंध्या वगैरे करून जपास आरंभ होई, तो शाळेची वेळ होण्यापूर्वी फक्त थोडा वेळ थांबत. फराळ करुन कपडे बदलून कामावर जात. मधल्या सुट्टीतला वेळही वाया घालवीत नसत. घरी येऊन हातपाय धुऊन वस्त्रे बदलून परत करता येईल तितका जप करून परत वेळेवर शाळा गाठत. संध्याकाळी शाळेतून आल्यावर परत स्नान करुन मंत्रानुष्ठानास सुरुवात होई, ते ठराविक संख्या पुरी होईपर्यंत झोपत नसत. झोप येऊ लागली तर शेंडी खुंटीला बांधून ठेवीत. म्हणजे डुलकी आलीच तर हिसका बसून जाग येई. पण अशी वेळ फारशी येतच नसे. प्रतिवर्षि 1।।कोटी जप तरी होई. याप्रमाणे 3।। कोटीच्या ऐवजी 4।। कोटी जप पुरा करुन श्रीगुरूंच्या भेटीस गेले व पुढील मार्गदर्शनाची विनंती केली. तेव्हा ‘राम तुला सर्व सांगेल' हे थोडक्यात आशीर्वादात्मक उत्तर मिळाले  व त्याप्रमाणे त्या परम दयाघन रामरायाने सर्व काही स्पष्ट सांगून निर्भय केले.

           मन रामी रंगलेले असल्याने केवळ नामजपानेच श्रींची कुंडलिनी आपोआप जागृत होऊन योगमार्गातील दिव्य अनुभव येऊ लागले. अंगास एक प्रकारचा सुवास येऊ लागला. सहज मनात एखादी गोष्ट आली तर ती पुरी होई. एकप्रकारे वाचिक तपही झाल्याने वाक् सिध्दी प्राप्त झाली. सहज बोलत ते खरे होई. अशा प्रकारे 1930  पासून दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्षे, साधना अधिकाधिक तीव्रतर होऊ लागली,  व देहाच्या ठिकाणी तेज दिसू लागले.

   ●● साधनसिध्द तीर्थयात्रा ●●


                1933 साली मे महिन्याच्या सुट्टीत एकट्याने फराळावर राहून प्रवास केला. पण प्रवासातही नित्यक्रमात खंड पडू देत नसत. कुंभमेळा, मथुरा, वृंदावन, गोकुळ,हरिद्वार, ऋषिकेश, स्वर्गाश्रम, आयोध्या,प्रयाग,  काशी,  गया इतका प्रवास झाला. आधीच रेल्वचे टाईमटेबल पाहून, सूर्योदय, सूर्यास्त केव्हा आहेत, वाटेत कुठली स्टेशन्स लागतात,  कुठे किती वेळ गाडी थांबते याचा अभ्यास करुन योजनापूर्वक त्या  त्या  स्थानकावर संध्येच्या वेळा चुकणार नाहीत  आशा रीतीने प्रात:स्नान,  सायंस्नान करून संध्या वगैरे करून व्यवस्थित गाडी गाठत. याप्रमाणे करीत असता हरिव्दारहून थर्ड्क्लासने ते अयोध्येस जात असतांना फक्त एकदा प्रातःस्नान चुकले. यानंतर 28-1-59-ला मुंबईहून परांड्यास रेल्वेने जाताना परत एकदा प्रात:स्नान चुकल्याने भस्मस्नानावर भागवावे लागले. म्हणजे 1933 ते 1959 या सव्वीस वर्षात एकदाही नियमात खंड पडला नाही व 1959 नंतर शेवटी महासमाधीपर्यंतही कधीही नियमात खंड पडला नाही.

             याप्रमाणे श्रीगुरुंच्या ठिकाणी पूर्ण ब्रम्हभावना ठेवून दृढ निष्ठेने नाम घेतल्याने बाबा गंगादासांच्या कृपेने श्रींना निर्विकल्पाची प्राप्ती होऊन ता. 27.1.1934 या दिवशी रात्री 1 वाजल्यानंतर जीवनमुक्तता प्राप्त झाली.


●● रामकृपेने ज्ञानाचे रहस्य गवसले ●●


            त्या दिवशी काही निमित्ताने ते रात्री बाबा गंगादासांकडेच वस्तीला राहिले होते. मध्यरात्रीच्या शिवपूजेनंतर निवृत्त झालेले बाबा परम प्रसन्न होते. आणि तिसरे कोणी माणूस नव्हते. बाबांनी श्रींना हाक मारली,  ‘बाबू जल्दी आ जा ! अब ज्ञानका रहस्य एकही बात में कहूँगा । तेरी लायकात हो तो परचीती मिल जाएगी देख ! जैसे हो वैसे रहना , कुछ बनना नही ‘ , त्यांच्या मुखातून निघालेले हे वाक्य श्रींच्या ह्रदयात प्रविष्ट होताच सर्व वेदान्तांच्या व भगवद्गीतेच्या उपदेशाचा लख्ख प्रकाश ह्रदयात पडला. त्या वचनातील रहस्य श्रींच्या अंतःकरणाच्या  ह्रद्पटावर अविस्मरणीय,  चिरस्थायी रीतीने वज्रलेपासारखे चित्रीत केले गेले व अपूर्व अवर्णनीय परमानंदमय दशा प्राप्त झाली.

‘ शब्दशक्तेरचिंतत्वात् शब्ददेवापरोक्षधीः' ही श्रीमद् आचार्योक्ती सत्यसृष्टीत उतरलेली श्रींनी प्रथम अनुभवली ! त्याचवेळी आशीर्वादांची वृष्टी केली. त्यापैकी एक आशीर्वाद ‘ श्री तुलसीदासजी तेरे मुखसे बोलेंगे ‘ हा होता. व त्या आशीर्वादांच्या प्रभावाने पुढील आयुष्यात श्रींच्या हातून श्रीरामचरितमानसचा ‘समवृत्त समछंद अनुवाद व श्री मानस गूढार्थ चंद्रीका'  ही विस्तृत टीका यांचे लेखन झाले, अशी श्रींची दृढ श्रध्दा होती.

लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी