प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ४

प.पू.श्री.प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग 4 प्रकरण - तिसरे गृहस्थाश्रम आणि साधकावस्था
      
      
श्रींचा विवाह 1915 मध्ये त्यांच्या भगिनीच्या विवाहानंतर, त्यांच्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध मुक्काम टिटवाळा, ता.कल्याण येथे, चौकचे श्री.श्रीधर रामचंद्र जोशी, पी.डब्ल्यूडी.त नोकरी करीत,त्यांच्या कन्या ‘ व्दारका ' हिच्याशी झाला.
           विवाह समयी समर्थांप्रमाणेच पळून जाण्याचा विचारही मनात आला होता.त्यांच्या वडिलांचे एक स्नेही श्री.गोपाळबुवा गणू पाटील  ( रा.आन्हे पो.पडघे जि.ठाणे ) यांनी मुखावरून हा विचार जाणला आणि शपथ घालून खुलासा विचारल्यामुळे त्यांना हा विचार सांगावा लागला. त्यावेळी त्यांनी एकच प्रश्न टाकला,नैतिक जबाबदारीचा. त्याचा विचार करता,” प्रारब्धास शरण “म्हणून दासबध्द उद्दंड वृषाप्रमाणे” पुढे सर्व घडले.
             विवाह समयी श्रींचे काॅलेजचे एक वर्ष फक्त झालेले होते. इंटर आर्ट्सला असतानाच विवाह झाला आणि नंतर परत बडोद्यास शिक्षणासाठी  गेले असता मनात जे विचार येत ते काव्यबध्द केले गेले. या काव्याखाली कवी गांगेय अशी नोंद असे.
             त्यांचे गृहस्थाश्रमाचे दोन कालखंड पडतात.  एक विवाहापासून म्हणजे 1915 ते 1929 पर्यंतचा आणि दुसरा इ.स. 1929 ते 1943 मध्ये चतुर्थाश्रम स्विकारला,तोपर्यंतचा. या पैकी इ.स. 1915 ते 1929 या चौदा वर्षातील घटनांकडे पाहिले तर इतर सामान्य लोकांप्रमाणेच त्यांच्या गृहस्थाश्रमाचे स्वरूप दिसून येते. 1929 नंतर मात्र आयुष्यक्रमास एकदम कलाटणी मिळून परमार्थ मार्गाचा सांधा जुळला आणि त्या मार्गाने आयुष्याची गाडी जोरात धावू लागली.  आणि अखेर तिने मुक्कामाचे ठिकाण यशस्वीपणे गाठले.

●● अध्यापन कार्याचा प्रारंभ ●●

           सन 1917 ची सुट्टी,बडोद्याहून मुरबाड,जि.ठाणे  येथे वडीलांकडे आले असता, प्लेगची साथ आल्याने खेडेगावी बि-हाड ठेवले होते. त्यावेळी तेथील मिशनरी हायस्कूल मध्ये दररोज 4 तास शिकवीत असत.
            सन 1918 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी बी.ए. पास झाले खरे, पण आर्थिक विवंचनेमुळे त्यावेळी आॅनर्सला बसता आले नाही.  याच वर्षी मिशनरी हायस्कूलच्या प्रिंसीपाॅलशी तात्विक विरोध निर्माण झाल्याने तेथील नोकरीचा राजीनामा दिला.
           पुढील वर्षी वसई हायस्कूलमध्ये नोकरी धरली पण सहा महिन्यांनी त्याही नोकरीचा राजीनामा दिला.  याच वर्षी लहान भाऊ नरहरी याची मुंज झाली.  नंतर 1920 मध्ये डहाणू येथे हायस्कूलमध्ये हेडमास्तर म्हणून नेमणूक झाली. पण संस्थेच्या सेक्रेटरीने वचनभंग केल्याने सात सहका-यांसहित राजीनामा दिल्याने सर्व स्कूल ओसाड पडले.
         यानंतर 1921 मध्ये चिंचणी,तारापूर येथे ‘ कांजी थरमसी हायस्कूल ' मध्ये नोकरी धरली.  येथे पगारही बरा होता. येथील नोकरी 16 वर्षे झाली.  हा सर्वच कालखंड श्रींच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा म्हटला पाहिजे.  याच काळात श्रींच्या आयुष्यक्रमास एकदम कलाटणी मिळून नराचा नारायण होण्याच्या दृष्टीने प्रगतीला सुरूवात झाली.

●● उपासनासदृश दिनचर्या ●●

        शाळेत श्री संस्कृत,गणित आणि इंग्लिश हे विषय शिकवीत.  त्यावेळी घरी क्लासही घेत. पण एका वेळी फक्त दहा मुले असत. जास्त नाही, कमी नाही.  आपल्या घरीच गच्चीवर शिकवीत.  कुणाच्याही घरी कधी जात नसत. जे एकदा ठरवायचे ते प्राणपणाने पार पाडायचे असा स्वभाव होता.  लोभाला,मोहाला बळी न पडता नेहमी त्यावर मात करीत.
         रोजचा दिनक्रमही आखीव असे. रोज गीतापठण, पूजा,अर्चा वगैरे चाले. जेवणात खोडी होत्या.  ताजी भाजी व दशमी फार आवडे. जेवणात खडा,गुंतावळ काही आढळले तर लगेच ताट सारून चालू लागत. पण पुढे परमार्थास सुरूवात केल्यावर जे भिक्षेत मिळे ते खाल्ले जाई. कित्येकदा करपात्र भिक्षा,  काला करून जेवण इत्यादी होत असे.  गृहस्थाश्रमात मात्र ह्यांचे जेवण एकदा व्यवस्थित झाले की घरातील मंडळीस हायसे वाटे.
            बागेची त्यांना फारच आवड होती.  तारापूरला घरी त्यांनी सुंदर बाग केली होती.  कलमी गुलाबाच्या 200 कुंड्या तयार केल्या होत्या.

●● सुखदु:खाचे प्रसंग ●●

         सन   1923  साली श्रींच्या प्रथम आपत्याचा,मुलाचा जन्म झाला.  पण दुर्दैवाने तो मृतच जन्मला. 1923 ते 1926 या काळात श्रींची शरीरप्रकृतीही खूप ढासळली होती. पोटदुखीचा आजार जडला होता व औषधांनी गुण काही येईना. 1926 साली तर दस-याच्या दिवशी प्राणांतिक जुलाब झाले. पण त्यानंतर मात्र पोटदुखीचा फारसा त्रास कधी झाला नाही.  ‘ परमार्थ मार्गास लागण्यापूर्वी 35 वर्षांचे असतानाच 60 वर्षांचे दिसत असू. पाठीला पोक येई,ज्वर अंगात मुरला होता, थोडे चालले तरी दम लागे. पंडुरोग्याप्रमाणे कळा आली होती. पण एकदा झडझडून   साधनेस सुरूवात केल्यावर तब्येत इतकी सुधारली की, 50 व्या वर्षी 25 वर्षांच्या तरूणास लाजवील असा उत्साह असे. कितीही झपाझप चालले तरी दम लागत नसे. आणि ज्वर तर पळालाच.' असे कधीमधी श्री सांगत असत. आणि ते प्रत्यक्ष दिसतही होतेच.
           सन 1929 साली सर्वात धाकट्या बहिणीचा विवाह झाला व एक प्रकारे कौटुंबिक जबाबदारी बरीच कमी झाली.  पण त्याच वर्षी धाकट्या भावाचे शीतांग सन्नितापाने निधन झाले.  त्यामुळे मनास फारच धक्का बसला व प्रपंचातील अशाश्वत सुखाचा वीट येऊन सक्रिय सवैराग्य परमार्थाची वाटचाल सुरू झाली.
      
●● सद्गुरूकृपेची तीव्र ओढ ●●

           त्यातच याच वर्षी  ( 1929 ) श्री श्रीधरस्वामी बिडवाडीकर ऊर्फ रावजीबुवा या सत्पुरुषाची काही निमित्ताने गाठ पडली व पूर्वीचे संस्कार उफाळून आले. त्यांच्या दर्शनाने व संगतीने विषयाच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होऊन भक्तिज्ञानाची उत्कंठा लागली.  आपल्यावर त्यांची कृपा व्हावी म्हणून रात्रंदिवस मनास तळमळ लागली.  ता. 19.3.1930 ला चिंचणीहून श्रीरावजीबुवा ( लालबाग,मुंबई ) यास विनंतीवजा जे पत्र लिहिले गेले, त्यावरून श्रींच्या त्यावेळच्या मुमुक्षुत्वाची कल्पना येऊ शकते.

जयजयाजी गुरूनाथा | दास ठेवितो पदी माथा |
विनंती आयकावी आता | दयाघना श्रीधरा || 1||

       या संपूर्ण पत्रातून सद्गुरूनिष्ठा, ज्ञानभक्ति प्राप्तीची तळमळ,  पूर्ण सद्गुरूकृपा व्हावी ही दुर्दम्य इच्छा, तसेच ह्रत्ताप शांत व्हावा म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन केलेली प्रार्थना इत्यादी अनेक गोष्टी दिसून येतात.

●● रामनाम मिळाले ●●

     या विनंतीचा उपयोग एवढाच झाला की, 1930 सालीच श्री. रावजीबुवा यांच्या लालबाग येथील मठात त्यांच्याकडून त्रयोदशाक्षरी राम मंत्र मिळाला.  याप्रमाणे मंत्र मिळाल्याने भक्तिज्ञान संबंधीची तळमळ अधिक तीव्रतर झाली व यासंबंधी अधिक मार्गदर्शन व्हावे अशी विनंती सद्गुरूंना केली गेली. तेव्हा साडेतीन कोटी जप करून ये,मग पुढचा मार्ग सांगेन अशी आज्ञा झाली. ही आज्ञा झाल्यावर श्रींचा रोजचा दिनक्रमच बदलून गेला. कधी एकदा जपसंख्या पूरी करतो व सद्गुरू कधी आपणास पुढील मार्ग दाखवतील हाच एक ध्यास त्यांच्या मनाला लागला व त्या दृष्टीने तळमळीने साधनेस प्रारंभ झाला.
              
●● रामानेच मार्गदर्शक धाडला●●

         यातच 1930 पासून सतत,  महाभगवद्भक्त,पूर्ण विरक्त, गूढलिंगज्ञानी,श्री बाबा गंगादास यांची संगती घडली. हे चिंचणी, तारापूरच्या किल्ल्यावर राहत असत. त्यांचे “ ईश्वरदासांवर " ,बाबूवर म्हणजेच श्रींच्यावर अत्यंत निर्हेतुक प्रेम होते. त्यांच्याच आशिर्वादाने श्री रामचरितमानसची गोडी लागली व त्याचे रहस्य प्राप्त झाले. संतप्रेम काय असते याचा रोमांचकारी अनुभव श्रींना त्यांच्या सान्निध्यात आला.  श्रीराम कृपेनेच असल्या बाळवृत्तीत राहणा-या संताची ओळख पटली. बाजारी संत कुठेही भेटतात, पण दोन वर्षे दोघे एकमेकांची परीक्षा करीत होते. बाबा गंगादास एक दिवस श्रींना म्हणाले ‘बाबू ! ( त्यांच्या ‘ बाबू ' या शब्दात काय जादू होती ! प्रेम ! प्रेम !प्रेम! केवळ शुद्ध प्रेम! )  दो साल हुए तू मेरी परिक्षा करता है और मै तेरी परिक्षा कर रहा हूँ । ऐसाही करना चाहिए । गुरू करना  बसके। सोना लेना कसके।’
             याप्रमाणे श्रींना मंत्रगुरू रावजीबुवा व रामायणगुरू श्री बाबा गंगादास या दोन्ही सत्पुरुषांची पूर्ण कृपा लाभली. आणि 1930 पासून त्यांची कठोर साधना सुरू झाली.  म्हणून 1929 ते 1943 पर्यंतचा, त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकारून ब्रह्मनिष्ठ सद्गुरू श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज  ( पोटे स्वामी,आळेफाटा ) यांच्याकडून दंडग्रहण करीपर्यंतचा काळ, हा कठोर साधनेचा काळ ठरतो. यावेळी गृहस्थाश्रमात राहूनच परमार्थ साधना कशी करता येते याचे एक उत्तम उदाहरणच श्रींनी लोकांना घालून दिले आहे.

●● निष्कामकर्म साधन ●●

             प.पू. रावजी बाबांकडून मंत्रदीक्षा जरी 1930 मध्ये मिळाली असली तरी 1928/29 पासूनच साधनेस सुरूवात झाली होती. त्या काळात पुष्कळ काव्य झाले.  त्यातूनच श्रींनी आपल्या मनास,इंद्रियास केलेला बोध, सद्गुरू प्राप्तीची तळमळ, तसेच आपल्या स्वतःच्या बळावर हा भवसागर तरून जाणे अशक्य आहे ही जाणीव असल्याने ‘ रामाचा केलेला धावा ' या सर्व गोष्टींवरून मनास किती आस लागली होती ते कळून येते. त्या सर्व काव्यात ‘ ईश्वरदास '  असा स्वतःचा उल्लेख केलेला दिसून येतो. यावेळी ‘ ईश्वरदास रामदासी ' स्वतःस म्हणवीत . यावरून रामदासी सांप्रदायाकडे कल होता व त्यास अनुसरून उपासना चालू होती असे दिसते. घराशी संबंध केवळ आवश्यक कर्तव्य करण्यापुरताच राहिला होता. ‘ ठायीच बैसोनि करा एक चित्त। आवडी अनंत आळवावा ।।'  असे घरी राहून सर्व कर्तव्ये  करीत असता सतत अनंतास आळविणे चालू होते. त्यामुळेच ‘ सुखे येतो घरा नारायण ।’ याचा अनुभव घेता आला.

लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी