प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ६

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग 6


●● धन्योस्मि ! कृतकृत्योस्मि ●●



यानंतर परत ता. 28.01.1934 रविवार दुपारी 1.30 वाजल्यावर तशीच स्थिती परत प्राप्त झाली.  ही अवस्था दीड दिवस टिकली होती. व या दिवसापासून खरी निर्भयता प्राप्त झाली.

        ‘ धन्योस्मि, कृतकृत्योस्मि! ' प्राण देहातून निघून न जाताच आज मी मरण पावलो!वा!वा! आनंद!!!! धन्य राम! धन्य नाम ! धन्य दास ! धन्य गुरू!धन्य शास्त्र! !!!

       बा मृत्यो ! ये ! आता तू केव्हाही आलास तरी काय करणार! ! हे चरममय गृह घेऊन जाणार एवढेच ना? ने खुशाल! ! आता या मरणामुळे पुन्हा मरण्याचा प्रसंगच चुकला ! मरणच नाही, मग जन्म तरी कोठून असणार !!!

           खासा न्याय! ज्या रत्नास शोधीत होते ते सापडले,  पण ते सापडताच शोधणारा नाहीसा झाला!  जिच्या सामर्थ्याची फार भीती वाटत होती व जी फारच विचित्र रचनापटु, तिचा थांगपत्ताच नाहीसा झाला!  ख-याचे खोटे व खोट्याचे खरे !

        ज्यसाठी त्यागबुध्दि उसळत होती, त्या त्यागबुध्दीचाच त्याग झाला. काळ्यांचे पांढरे व
पांढ-याचे काळे!! पण एवढे झाले तरी बेटा प्रारब्ध  स्वभावप्रकृति सोडत नाही. सोडो न सोडो, राजा मरो, राणी सती जावो. साक्षीला काय सुख दु:ख!

        किती सुंदर मार्ग! सरळ, सोपा,फुकाचा, दुखाचा , स्वत:चा! खडा नाही, काटा नाही, नेम नाही,  धर्म नाही.  पण एक, एक गुरुवर विश्वास!  विश्वास! श्रध्दा! दृढ विश्वास! धन्य श्रध्दे! काय तुझे सामर्थ्य!  काय तुझी लीला! मर्त्याचा अमर! जन्मशीलाचा अजन्मा!रंकाचा सार्वभौम!दुष्टाचा सुष्ट! विषयीचा अविषयी! दुष्काळाचा सुकाळ करतेस! धन्य धन्य तुझी! तू काय करणार नाहीस ! पण…पण...लवकर हाती येत नाहीस ना! येऊ लागलीस की तुझी सवत ‘संशय’ झडप घालून तुला पार गिळून टाकते! पण तुझी माता ही धन्य! तुला पुन्हा देतेच!

         ।।  जागृती ।।

   तो निजलेला जागा झाला जेव्हा । ते स्वप्न निमाले तेव्हा ।। 1 ।।

या स्वप्नी तो सदैव जागृत आहे । ती निद्रा दूरचि राहे ।।2।।

की मरूनी जे संदेह लोकी जगती । ते धन्य साच या जगती ।।3।।

तो जादूचा प्रेरक मोठा कुशल । पाडिले रिपू सपशेल ।।4।।

व्यतीरेकाने ग्रंथी तोडुनि मोठा । दाविले सर्व हा खोटा ।।5।।

ही लवणाची जळांत पुतळी मिळता । तोयचि ती झाली बघता ।।6।।

जे आजवरी दोषपूर्ण की दिसले । गुणपूर्ण आज ते झाले ।। 7।।

ते मौनाने तेणे स्पष्टचि कथिले । अव्यक्ती व्यक्तचि झाले ।।8।।

‘ मी ' नाहीसा जेव्हा झालो पाहे। ‘ तो' आहे सर्व दिसे हे ।।9।।

परि जेथे हो ‘ मी ' च राहिलो नाही । “ तू " ‘तो' ही कैसी ग्वाही ।।10।।

चालः- ‘  मी' ‘ तू '  ‘ तो'  नाही वार्ता । जे असे असे तत्वता। जो नाही कर्ता भोक्ता।।

तो तोची रे शेष आता की आहे। हे सर्व विचित्रची पाहे।।11।।

जगि प्राप्य असे आता उरले नाही । परि घडो,घडे जे काही ।।12।।

जे कार्यत्वे होते करणे कृत्य । ते झाले कृत आश्चर्य ।।13।।



●● पिशाच्चेच पिशाच्चे ●●


           एकदा असे झाले की, प्रातःस्नानासाठी तारापूरला समुद्रावर निघाले होते.  त्या दिवशी घड्याळ बंद पडले की काय झाले कुणास ठाऊक, पण नेहमीपेक्षा खूपच लवकर बाहेर पडले होते.  समुद्र किना-याकडे जाताना पाहतात तो आपल्यापुढे बरीच मंडळी चालली आहेत.  पाहता पाहता ती मंडळी पाण्यापर्यंत गेली व एकदम दिसेनाशी झाली.  तेव्हा लक्षात आले की, ही बहुधा पिशाचे असावीत कारण स्मशानभूमी तेथे जवळच होती. तोपर्यंत  पिशाचयोनीवर वगैरे विश्वास नव्हता.  राहण्यास तर जेथे जात तेथे भूतपिशाच्यांनी झपाटलेले वाडेच पसंत करीत. कारण भाडे कमी पडे. आणि श्रींचे वास्तव्य तेथे झाल्यावर कुठल्याही घरात त्यांना वा त्यांच्या कुटुंबियाना कधीच कुणी त्रास दिला नाही. पुढे संन्यासाश्रम घेतल्यानंतरही परंडा, उस्मानाबाद येथेही असेच झाले.


●● हा पेढा मुलगा झाला म्हणून,हा दुसरा पेढा तो गेला म्हणून ●●


याप्रमाणे 1934 सालच्या सुरुवातीसच नेमलेल्या पेक्षाही अधिक जपसंख्या पूरी झाली.  श्रीगुरूंच्या, बाबा गंगादासांच्या आशीर्वादाने योगमार्गात प्रगती होऊन स्वस्वरूप ज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे येथून पुढचे श्रींचे आयुष्य केवळ परोपकारार्थच होते. एकीकडे प्रपंचाचा गाडा ओढीत असता मनाचा चतुर्थाश्रम घेण्याकडे कल होत होता. कदाचित् या कारणानेही असू शकेल,  पण तो दिव्य अनुभव आल्यानंतर ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे,  ‘ वैराग्याचे गाठुले। अंगी त्राण होते भले। तेही नावेक ढिले। तेव्हा करी।।  ( 18.1077) या न्यायाने यमनियम जरा सैल केले असावेत.  परिणामी 1935 साली सौ. कमलाबाई कर्वे यांना पुत्ररत्नाची  प्राप्ती झाली.  त्यावेळी त्या माहेरी गेल्या होत्या.  रीतीप्रमाणे  बाळलेणी व पेढे घेऊन श्री सासुरवाडीस आले. आल्यावर मुलाची कुंडली पाहून आठ दिवसातच  हा जाईल असे त्यांनी तेथील मंडळीस सांगितले. त्याप्रमाणे तो बालक जन्मल्यापासून आठवे दिवशी गेला. श्रींनी परत निर्विकारपणे चिंचणी तारापूर गाठले. दुसर्‍या दिवशी शाळेत कामावर गेल्याबरोबर सर्व सहकारी भोवती जमले व मुलगा झाल्याबद्दल  पेढे मागू लागले. तेव्हा खिशात पेढे आणलेच होते. त्यातील प्रत्येकाच्या हातावर एकेक पेढा ठेवून सांगितले,  ‘ हा पेढा मुलगा झाल्याबद्दल.' नंतर प्रत्येकास आणखी एकेक पेढा दिला व सांगितले ‘ हा तो गेल्याबद्दल.’ सर्व सहकारी आ वासून पाहतच राहिले.

लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी