प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ८

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती चरित्र – भाग ८



     ४. वानप्रस्थाश्रम आणि संन्यासग्रहण
            
       
फेब्रुवारी १९३७ मध्ये नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर श्रींनी पायी सज्जनगडावर जाण्याचे ठरविले . त्यावेळी पहिल्या मुक्कामापर्यंत बाबा गंगादास श्रींच्या बरोबर होते . त्यांनी परत जाताना श्रींना शुभाशीर्वाद दिला होता. या यात्रेतच  { चिंचणी-तारापूर ,कुलाबा जिल्हा ते सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हे अंतर साधारण २०० मैल आहे . } साताऱ्याच्या अलीकडे १५-२० मैलावर दुपारी १२ चा सुमार झाला . पायही थकले होते. एका झाडाखाली विश्रांतीसाठी म्हणून श्री बसले. बरोबर शिदोरी काहीच नव्हती म्हणून सहज गीतेतील “ अनन्याश्चिन्तयन्तो माम् ” या श्लोकाचा विचार आला व श्रीरामप्रभू दुपारच्या भोजनाची काय व्यवस्था करतात पाहू या, असे वाटले . थोडा वेळ गेल्यानंतर लांबून एक शेतकरी येताना दिसला व हळूहळू तो श्रींच्या जवळ येऊन ठेपला . त्याने घोंगड्यातून शेंगा,गुळ,केळी वगैरे पुढे ठेऊन वंदन केले . श्रींना विस्मय वाटला आणि प्रभूची परीक्षा घेतली म्हणून दुःखही झाले . त्या शेतकऱ्यास ह्या जीनसा का आणल्या म्हणून विचारता त्याने सांगितले , ‘ लांब झाडाखाली कोणीतरी बसले आहे असे दिसले  व एकदम प्रेरणा झाली की, दुपारी १२ ची वेळ आहे. आपण काहीतरी खावयाची जिन्नस त्यांना नेऊन द्यावे. त्याप्रमाणे घेऊन आलो. हे ऐकून रामास आपण विनाकारण शिनवले असे मनात येऊन श्रींचे डोळे भरून आले.


रामायणाची गोडी वाढू लागली

       १९३७ मध्ये चिंचणीला असताना सामुद्री मातेच्या देवळात ते रोज तुलसीरामायाणावर प्रवचने करू लागले . ही पहिली वेळ होती. त्यावेळी संपूर्ण रामायणावर प्रवचने करण्यास साधारण ५ महिने लागले . बाबा गंगादास रोज १.५ मैल दूर रात्री श्रवणास येत असत . !!! धन्य बाबा !!!!
       यानंतर १९३७-३८ मध्ये श्रींनी बिऱ्हाड मोडून, चिंचणी – तारापूर सोडून एकांतात राहण्याचे ठरवले. त्यावेळी श्रींची मनस्थिती ‘ जे विखे रांधिली रससोये। जें जेवणारा ठाउकी होये। तो तत्वची सांडूनी जाये। जयापरी।। तैसी संसारा या समस्ता। जाणिजे अनित्यता। तै वैराग्य दवडिता। पाठी लागे ।।’ अशा प्रकारची होती. ते चिंचणी-तारापूर हून निघून चौकला आले व एकटेच चौक , कुलाबा जिल्हा येथे धन्येश्वराच्या पडवीत वास्तव्य केले. १९३८-३९ मध्ये श्री धन्येश्वर मंदिरात राहत असताही संपूर्ण रामाचरितमानस सांगितले. त्यावेळी त्यांना ९ महिने लागले.
       या ठिकाणी २/३ वर्षे साधारणतः मुक्काम झाला. अधून-मधून प्रवासास जाणे होई. पण परत चौकला येत असत. येथेच एकदा विहिरीवर स्नानास गेले असता सर्पाने दंश केला. पण काही औषध न घेता बरे वाटले.
यावेळी शहापूर, नरसापूर ,भोर संस्थानातील बनेश्वर , करंजाई देऊळ अशा विविध ठिकाणी जाणे झाले. एकांत, निर्जन स्थानी खुशाल राहत. १९३६ ते १९३८ हा सर्व काळ फराळावर काढला . खजूर , केळी, व रात्री भिजत घातलेले एक मुठभर शेंगदाणे एवढाच आहार असे. कुणी दुध आणून दिले तर घेतले जाई.

नर्मदेच्या कुशीतील साधना

       यानंतर एकदम दूर नर्मदेच्या काठी जाणे झाले. एक तर साक्षात्कार करून घेणे किंवा देह विसर्जन हे दोनच पर्याय ठरविले होते. नर्मदा तटाकी घोर अरण्यात श्रींनी अहिल्यादेवींनी बांधलेल्या कोटेश्वर मंदिरात ११ दिवस राहून अनुष्ठान करण्याचे ठरविले. बरोबर ११ दिवसच पुरतील एवढेच फराळाचे घेऊन { खजूर, शेंगदाणे , गुळ } जाणे झाले. ह्या स्थानाभोवती १२ मैल सर्वत्र जंगल पसरलेले. वाघाच्या डरकाळ्या व आस्वलांच्या आरोळ्या पहाटे व रात्री ऐकू येत. मोठे मोठे भुजंग भरपूर होते. अगदी निर्मनुष्य स्थान होते. अशा त्या शिवमंदिरात मुक्काम असता एक दिवस अचानक एक वृद्ध ब्राम्हण तेथे आला. भोजनाची वेळ, त्यात अतिथी पाहून श्रींनी आपल्या जवळील पदार्थातून खजूर शेंगदाणे इत्यादी त्यास देऊन तृप्त केले. खाऊन पिऊन आशीर्वाद देत तो ब्राम्हण बाहेर पडला न पडला तोच श्रींच्या मनात आले , हा इतका वृद्ध ब्राम्हण इतक्या घोर अरण्यात आला कसा ? मनात हा विचार येताच तत्काळ धावत जाऊन रस्त्यावर खूप शोध घेतला पण तो ब्राम्हण कुठे दिसला नाही. यावरून त्या वृद्ध ब्राम्हणाच्या रूपाने श्री शिवजींनीच दर्शन दिले असावे असे श्रींना वाटले. 


सगुण दर्शनाचा सोहळा

याप्रमाणे बरोबर मोजक्याच आणलेल्या अन्नपदार्थातील काही भाग दिला गेल्याने उरलेले दिवस ते पदार्थ पुरणे शक्यच नव्हते . पण श्री बाबा गंगादासांच्या शब्दावर पूर्ण विश्वास असल्याने जराही चिंता उत्पन्न झाली नाही. आणि खरोखरच अनुष्ठान संपते न संपते तोच ‘ जय सियाराम ' असा घोष करीत ४ साधू देवळात आले. हे वास्तविक राम चतुष्टयच तेजस्वी सगुण रुपात प्रगट झाले होते. श्रींनी त्यास ओळखून चरण घट्ट धरले व त्यांनीही प्रेमाने श्रींना आलिंगन दिले व सर्व स्वाऱ्या तेथून अंतर्धान पावल्या. ज्या उद्देशाने हे कठोर अनुष्ठान केले होते ते अशा रीतीने सुफळ संपूर्ण झाले.नंतर एक माणूस कमी पडलेले फराळाचे समान घेऊन बरोबर वेळेवर अचानक आला.

सर्प व्याघ्र आम्हा सोयरे वनचरे

              नर्मदाकाठी प्रवास करीत असतानाच एकदा असे झाले की  प्रातःस्नानासाठी नर्मदेवर गेले असता वाघाची डरकाळी ऐकू आली . एक क्षणभर दचकायला झाले. किंचित भीतीही वाटली. पण दृढ निर्धाराने तसेच पाण्यात उतरून स्नान केले. सुसरी, मगरी तर अनेक वेळा समोर दिसत . पण देहाचे प्रारब्ध जर वाघाचे किंवा मगरीचे भक्ष्य होण्याचे असेल तर तसेच होणार, तसे नसेल तर ते कशाला या देहाच्या वाटेस जातील असे मनात चिंतून आपल्या नित्य प्रातःस्नानाच्या नियमात खंड पडू दिला नाही.
          या काळातच खेडीघाट , नर्मदातीरी ओंकारेश्वर , उज्जैन , अजमेर, पुष्कर, इत्यादी तीर्थक्षेत्रास भेटी दिल्या.  अशा रीतीने केवळ फराळावर राहून , घोर अरण्यात वास्तव्य करून एकांत साधना श्रींनी केली. हरीभजनाशिवाय दुसरा व्यवसाय नव्हता . सर्व वेळ जप, नामस्मरण , ध्यानधारणा यात जाई.
          एकदा पहाटेस जपास प्रारंभ करणार , तो डोक्या जवळील खुंटीवर अस्सल नाग दिसला तरी श्रींचे लक्ष तिकडे गेले नाही. आणि नेहमीप्रमाणे एकाग्रतेने श्रींनी जप केला. नाग श्रींच्याकडे फिरकला सुद्धा नाही. धर्माचरण अत्यंत उत्कटतेने झाले की वैराग्य आपोआप येते असे संत सांगतात. श्रींचे उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहेच. याप्रमाणे सर्वत्र प्रवास करून अजमेरहून आषाढ शुद्ध ११ शके १८६० मध्ये भीमातीरी खेड येथे आगमन झाले. 

लेखिका :---  कमलताई बा. वैद्य


  • ||  जय जय रघुवीर समर्थ ||

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी