प.पू श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र-भाग ७
प.पू श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र-भाग ७
●● सौभाग्यवतींना दीक्षा दिली ●●
पूर्वाश्रमीच्या श्रींच्या पत्नी सौ, कमलताई कर्वे ( द्वारकाताई )
श्रींना प्रथम आपत्य 1923 साली झाले होते. त्यानंतर जवळजवळ 12 वर्षांनी दुसरा मुलगा झाला आणि गेला. कदाचित् स्वभावप्राप्तीनंतर श्रींच्या मनात चतुर्थाश्रम स्वीकारण्याची इच्छा होतही असेल. आपण चतुर्थाश्रम स्वीकारला तर पत्नीस एखादे अपत्य असेल तर त्याच्या आधारे जीवन कदाचित सुसह्य होईल असा विचारही श्रींच्या मनात असेल. मात्र ह्या व्दितीय पुत्राच्या निधनानंतर 1935 सालीच सौ. कमलाबाई कर्वे यांना मंत्रदीक्षा दिली असा स्पष्ट उल्लेख आहे. पूर्वाश्रमात आणखी कोणास दीक्षा दिल्याचे आढळून येत नाही. ह्याच श्रींच्या पहिल्या शिष्या. येथून पुढे पतिपत्नीसंबंध संपून गुरूशिष्यसंबंध प्रस्थापित झाला असावा असे वाटते. ( श्री त्यांना 'व्दारकाताई' म्हणत. )
●● सीतामाईंचे भावदर्शन ●●
तसेच श्रींच्या सांगण्यात येत असे की, सर्व राममय पाहण्याचा अभ्यास चालू होता. स्वतंत्र झोपडीत राहात असतच. एकदा संध्याकाळच्या वेळी सौ.व्दारकाताई दूध घेऊन झोपडीशी आल्या. पुरेसा प्रकाश नव्हता. त्यामुळे नक्की कोण आले आहे हे कळले नाही. पण बांगड्यांचा आवाज झाला तेव्हा सीतामातेसमान समजून हात जोडले गेले. सौ. ताई आणखी पुढे आल्या तशी ओळख पटली. पण एकदा मातेसमान समजून नमन केले गेले,त्यामुळे तेथून पुढे पत्नी या नात्याने परत कधी पाहिलेच नाही.
●● मातृनिधन ●●
याप्रमाणे 1929 पासून जी साधना सुरु झाली होती,त्या साधनेने परमोच्च बिंदू गाठला होता. आता मिळवायचे काही उरलेच नव्हते. आता मिळालेले वाटायचे होते. अशा परिस्थितीतच 1936 मध्ये टिळक पंचांगीय वैकुंठ चतुर्दशी, बरेच दिवस भ्रान्तमस्तक असलेल्या मातेस भाजून मृत्यु आला. चुलीशी दुपारी 4.30 वाजता शेंगादाणे भाजत असता एकाएकी लुगडे पेटले व संध्याकाळी 6.30 वाजता त्यांनी इहलोक सोडला.
1929 मध्ये धाकटा भाऊ ‘ शीतांग सन्नितापाने गेला तेव्हा श्रींच्या मनास जो धक्का बसला होता त्यावेळपेक्षा श्रींची मानसिक अवस्था यावेळी अगदी वेगळी असल्याने मातृनिधनाचे दुःख त्यांना कसलेच जाणवले नाही . मात्र माता परलोकवासी झाली म्हटल्याबरोबर प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे वाटू लागले. कारण त्यानंतर लवकरच 1 फेब्रुवारी 1937 ला राजीनामा देऊन नोकरी कायमची सोडली.
लेखिका:- श्रीमती कमलताई बा.वैद्य
|| जय जय रघुवीर समर्थ ||
Comments
Post a Comment