प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ३

     प.पू.प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज चरित्र भाग - ३ 
              ●● स्त्री मोह निपटून काढला ●●


         बडोद्यास प्रथम वास्तव्य  मामांकडेच होते, पण नंतर स्वतंत्र खोली घेऊन राहत असत . असे राहत असता एकदा असे झाले की ,उन्हाळ्यामुळे त्या घरमालकाची सर्व मंडळी व इतर बि-हाडकरू सर्वच गच्चीवर झोपण्यास गेले होते. मध्यरात्र उलटून गेल्यावर श्रींना वाटले की, आपल्याला कुणीतरी हलवून जागे करीत आहे. पाहतात तो मालकाची तरुण बालविधवा बहिण होती. तिने त्यांना जाग येताच ओठावर बोट ठेवून न बोलण्याची  खूण  केली.मोठाच  अवघड प्रसंग उद्भवला ! ओरडायचीही सोय नव्हती,  कारण ती मुलगी सर्व उलटच करुन सांगणार!! तेवढ्यात एकदम मनात विचार आला की काहीही करुन या प्रसंगातून सुटका करून घेतली पाहिजे. त्यांनी त्या मुलीस ‘ करंगळी’ दाखवून जाऊन येतो म्हणून खूण  केली आणि तेथून जिना उतरून जे सटकले ,ते परत दुस-या दिवशी सकाळी आपले सामान नेण्यासच तेथे गेले.

              हा मोहाचा प्रसंग असा प्रसंगावधान राखून टाळला. पण एकदा अगदी या उलट प्रकार घडला. एकदा देवळात देव दर्शनास गेले असता अत्यंत रूपवान् अशी स्त्री नजरेस पडली. मनास वारंवार बजावूनही नजर वरचेवर तिच्याकडेच वळू लागली. मोठ्या प्रयासाने मन आवरून तेथून निघून गेले. परत दुसरे दिवशी त्याच वेळी देवळात गेले,तो फिरून ती स्त्री दृष्टीस पडली व आदल्या दिवशी प्रमाणेच तिच्याकडे पाहण्याचा मोह होऊ लागला.  तेव्हा तडक घर गाठले. तिस-या दिवशी परत त्या वेळेला देवळात जावे, कदाचित ती स्त्री फिरून दृष्टीस पडेल असा विचार मनात येऊ लागला. तेव्हा मात्र मनास बजावले की,आता मात्र हद्द झाली, आता परत दृष्टीस हा मोह झाला तर डोळे फोडून घेण्यात येतील. तेव्हा बाबा रे, सावध हो! नेत्रांनो, लक्षात घ्या, फिरून तिकडे दृष्टी वळली तर तुमची धडगत नाही. आणि काय आश्चर्य!  असे बजावल्या बरोबर मनाचे सर्व चाळे थांबले व मन एकदम शांत झाले. फिरून म्हणून नेत्रांना ‘ स्त्री ‘ या विषयासंबंधी मोह उत्पन्न झाला नाही.


●● धर्मकारणास जीवन वाहिले ●●


          बडोद्यास शिक्षणासाठी असता याप्रमाणे दोन घटना घडल्या. पण एकंदरीत हा शिक्षणाचा काळ आनंदात गेला असावा. श्री.शंकर देव, श्री.देवधर,  श्री.दत्तात्रय नारायण कर्वे या तिन्ही मित्रांनी या काॅलेज शिक्षणाच्या दिवसातच आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित केले होते.  श्री. देव यांनी राजकारणास , श्री.देवधर यांनी समाजकारणास आणि श्री कर्वे यांनी धर्मकारणास वाहून घेण्याचे ठरविले होते. यावरूनही धर्माचरणाकडे श्रींचा प्रथमपासूनच कल असावा असे दिसते.

         पुढे अनेक वर्षांनी यापैकी श्री.देव आणि श्री.कर्वे यांची योगायोगाने गाठ पडली असता सहज बोलण्याच्या ओघात श्री.देव म्हणाले की,जसा या राजकारणात पडलो आहे तसे सुख व शांती अनुभवासच येत नाही असे झाले आहे. यावर श्री.कर्वे म्हणजेच श्रींनी असे उत्तर दिले होते की,आम्हाला मात्र आमच्या क्षेत्रात याउलट अनुभव आला आहे. दुःख कसे ते आता उरलेच नाही. केवळ सुखच सुख अनुभवास येते.

           यानंतर पुढे 1924 मध्ये श्रींनी एस.टी.सी. ची परिक्षा दिली.ग्रॅज्युएट झाल्यावर मामलेदाराची नोकरी त्याकाळी सहज मिळत असताही तत्त्वाविरूध्द म्हणून ती स्वीकारली नाही.  एवढेच नव्हे तर सरकारी नोकरी करावयाची नाही असा त्या काळास अनुसरून त्यांनी दृढ निश्चय केला होता.

लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी