प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ९

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - ९

गायत्री पुरश्चरण


खेडच्या केदारेश्वर मंदिरातील मठात वास्तव्य व्हावे असा ईश्वरी संकेत होता. येथे श्रींचे मन रमले. व तेथे राहून २४ लक्षात्मक गायत्री पुरश्चरण अयाचित वृत्तीने पूर्ण करावे अशी वृत्ती उठली. व त्याप्रमाणे सर्व तयारी करून यंत्रपूजेसह नित्य गायत्रीच्या जपानुष्ठानास प्रारंभ झाला. १९४१ साली आरंभलेले हे पुरश्चरण २१ महिन्यांनी १९४२ मध्ये पूर्ण झाले.
           या काळात सतत नंदादिपही ठेवला होता. एकदा रात्री झोप लागली असता कुणीतरी ‘अरे उठ ,दिव्यात तेल घाल ' असे म्हटल्याने एकदम जग आली तर खरोखरच तेल संपत आले होते. पटकन हातपाय धुऊन तेल घातले. अशा रीतीने अगदी यथासांग हे अनुष्ठान पूर्ण झाले.

प्रवचन सेवेचा आनंद

          फेब्रुवारी १९३७ मध्ये नोकरी सोडल्यापासून साधारणपणे जेथे जेथे मुक्काम होई तेथील देवळात तुलसीरामायणावर प्रवचने देत असत. अगदी प्रथम संपूर्ण रामायणावर प्रवचने करण्यास ५ महिने लागले होते, पण उत्तरोत्तर हा काळ वाढतच चालला. कारण रामायणाचे जितके सखोल परिशीलन होऊ लागले तितके त्यातून अधिक अर्थ , अधिक भाव निघू लागले. व मग जास्त जास्त वेळ लागू लागला.
         स्वतः नित्य रामायणाचे वाचन तर अखंड चालूच होते. खेड येथे केदारेश्वर मठात नऊ महिन्यात केवळ बालकांड सांगून झाले. जेथे सहज योग येईल तेथे 'श्रीमानसाचा प्रसार करणे'  हि गुरुदक्षिणा बाबा गंगादासांनी मागितली होती. त्यामुळे किरकोळ प्रवचनेही जेथे जातील त्या ठिकाणी सुरूच असत.

सौभाग्यवतींची अनुज्ञा
          
 गायत्री पुरश्चरणाची सांगता झाल्यावर श्रींनी चतुर्थाश्रम घेण्याचे ठरविले. अर्थात यासाठी पत्नीची संमती हवी. तेव्हा सौ. कमलाबाई कर्वे यांना पत्र गेले की , चतुर्थाश्रम घेण्याचा विचार आहे. त्यास तुमची संमती हवी. अन्यथा अग्निहोत्र ठेऊन वानप्रस्थाश्रम स्वीकारून राहता येईल. हे मान्य असेल तर हे पत्र पोहोचल्यापासून १५ दिवसाचे आत तुम्ही खेड येथे येऊन हजर व्हावे. या प्रमाणे १५ दिवस वाट पहिली जाईल. तसे न झाल्यास चतुर्थाश्रम स्वीकारण्यास तुमची संमति आहे असे गृहीत धरून चतुर्थाश्रम स्वीकारला जाईल. यावर काहीच पत्रोत्तर न आल्याने चतुर्थाश्रम स्वीकारण्याचे निश्चित ठरले व त्याप्रमाणे सर्व व्यवस्था करू लागले.

संन्यास म्हणजे कायद्याच्या दृष्टीने मरणच !!!
            संन्यास म्हणजे एक प्रकारे कायद्याच्या दृष्टीने मृत्युच { Legal death  } असतो. त्यात आपणच आपले श्राद्ध करावयाचे असते असे म्हणतात. त्यावेळी खेड येथे मॅजिस्ट्रेट पुढे , आपण संन्यास घेत असून तो एक प्रकारे आपला कायदेशीर मृत्यूच होय असा कबुलीजबाब लिहून दिलेला श्रींच्या कागदपत्रात आढळून आला. यानंतर पूर्वाश्रमीचे स्थावर, जंगम कुठल्याही वस्तूबद्दल कुठलाही अधिकार { हक्क } वा कर्तव्य शेष राहत नाही.
           चिंचणी-तारापूर १९३७ मध्ये सोडल्यापासूनच सौ. कमलाबाई कर्वे , आपल्या बंधुंकडेच चौक येथे राहत होत्या. आणि त्यांच्या हयातीपर्यंत त्यांना उत्पन्न मिळेल अशी जमीन त्यांचे नावे करून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावली होती. याबद्दल त्या कुणावरही अवलंबून नव्हत्या. श्रींनी संन्यास घेतला त्यावेळी आई-वडील कुणी हयात नव्हतेच. मुलगेही दोन झाले व गेले. पत्नीची याप्रमाणे व्यवस्था केली . व सासूसासरे निवर्तल्यावरच संन्यास घेतला. यामागे वृद्ध माता –पिता यांना दुःख होऊ नये हाच हेतू दिसून येतो. याप्रमाणे सर्व निरवानिरव करून खेड येथेच ता . १८/१/१९४३ ला,टिळक पंचांगाप्रमाणे पौष शुद्ध द्वादशीस त्यांच्या कुंडलीप्रमाणे स्थिरलग्नी स्थिरनवांशात चतुर्थाश्रामाचा स्वीकार केला.

लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य  

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी