प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग ११

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - ११


प्रज्ञावासुदेव अमर झाले

           
याप्रमाणे हा मणिकांचन योग जुळून आला. श्रीसद्गुरु कितीही थोर असले तरी त्या योग्यतेचा शिष्य नसेल तर त्यांचे मोल चढत नाही. निवृत्तीनाथांचे ज्ञानेश्वरांमुळे,समर्थांचे कल्याणस्वामींमुळे गुरुत्व सार्थ ठरले. या सर्व अलौकिक गुरुशिष्य जोड्यांप्रमाणे श्री वासुदेवानंदांचे नावाचा जयजयकार करून श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांचा कीर्तिध्वज आभाळात उंच फडकाविला. ‘प्रज्ञावासुदेव’ हे नाव अजरामर झाले. नाहीतर भारतात ब्रह्मनिष्ठ, अत्यंत श्रेष्ठ अशा पुरुषांची उणीव नाही. पण त्याच तोडीचे शिष्य मिळाले म्हणजे त्या शिष्यांमुळेच श्रीगुरुंनाही अधिक कृतार्थता प्राप्त होते. त्यांचे नाव त्रिभुवनात दुमदुमू लागले.

तुमचे गुरुबंधू तुम्हीच

           केवळ संकल्पाने शक्तिपात करण्याची अद्भुत शक्ती श्री महाराजांच्या ठिकाणी होती,  हे श्रींच्या तत्काळ पूर्णपणे अनुभवास आले. आणखी एक विचित्र प्रकार असा घडला की, नामकरणाच्या वेळी श्रींनी महाराजांना त्रिवार विनंती केली की 'रामानंद'  किंवा 'राघवानंद' नाम ठेवल्यास अनायासे रामस्मरण होईल. पण  श्री महाराजांनी निक्षून सांगितले की, 'प्रज्ञानानंद' ठेवावयाचे आहे.’ व तेच ठेवले गेले. याचा परिणाम म्हणजे सन १९४३ नंतरचे लेखन ! आधी जे काही काव्य लिहिले गेले त्याच्याशी नंतर झालेल्या लेखनाची तुलना केली तर खरोखरच तोंडात बोट घालण्याजोगा फरक आढळून येतो. यावरून आळ्याच्या महाराजांनी त्या नावाबरोबरच आपले सर्वस्व या दीन दासास दिले,  असे उत्तरोत्तर प्रचीतीस येऊ लागले,असे श्री म्हणत असत. ते किती सार्थ आहे त्याची प्रचीती येते.
           श्रींनी एकदा महाराजांना ‘ प्रज्ञानानंदाचे दुसरे गुरुबंधू कोण,कुठे आहेत’ असे विचारले असता, 'तुमचे गुरुबंधू तुम्हीच. नुसते आश्रमी पुष्कळ झाले,त्यांच्याशी काय कर्तव्य!'  असे उद्गार काढले.

गुरुशिष्यांचा थोर अधिकार

           आळ्याच्या महाराजांना १९४३ च्या पूर्वीच अर्धांगाचा झटका येऊन डावे अंग निरुपयोगी झाले होते. मधुमेहाचा विकार तीव्र होता. त्यामुळे सदा अवधूत स्थितीतच राहत असत. उठणे,बसणे, कौपिन नेसणे,  इत्यादी काही करता येत नसे.शौचादी क्रियाही बसल्याजागीच आसनावर होत असत. परातीत उचलून ठेऊन स्नान घालावे लागत असे. मांड्या वगैरे भागांवर अनेकवेळा तळहाताएवढी फाफरे पडत. त्यांना मुंग्या डसत पण हू की चू नाही. महाराजांच्या देहास होणारे कष्ट श्रींना पाहवेनात , तेव्हा श्रींनी एकदा विनंती केली की , ‘आपले सर्व रोग व पीडा या आपल्या दासास देऊन, पुष्कळ वर्ष भोगीत असलेल्या या असह्य कष्टातून मोकळे व्हावे. आपल्या कृपेने या स्वामीच्या देहास ती उपाधी फार काळ घ्यावी लागणार नाही .’ यावर उत्तर मिळाले की, 'मी देऊ शकेन व तुम्ही घेऊ शकाल हे अगदी खरे,पण ज्याने केले त्यानेच भोगणे योग्य. फार त्रास होतो असे मनाला वाटले की,प्राण ब्रम्हरंध्रात चढविताच कष्ट मुळीच नाहीत .’ या वाक्याने श्रींना कळले की,सद्गुरू महाराजांनी योगाभ्यास उत्तम केला असला पाहिजे. या गोष्टीवरून गुरुशिष्य दोघांचाही श्रेष्ठ अधिकार व एकमेकांबद्दलची अत्युत्कट प्रीती या दोहींची कल्पना येते.!!! धन्य ते परमगुरु व धन्य त्यांचा तो एकुलता एक लडिवाळ शिष्य !!

लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य


|| जय जय रघुवीर समर्थ ||        

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी