प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १२


  • प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १२


५.पुणे जिल्ह्यातील वास्तव्य

      
  


शके १८६४ मध्ये श्रींनी पौषात चतुर्थाश्रम स्वीकारला. म्हणजे इ.स. १९४३ च्या जानेवारीत. पुढे फेब्रुवारीत १२/२/१९४३ ला दंडग्रहण विधी पार पडला. यावेळीही श्रींचा मुक्काम केदारेश्वराच्या मठातच होता.
        त्या वर्षीचा चातुर्मास खेडला मठातच झाला. नित्य रामायणावर प्रवचने चालूच असत.याचवेळी सामुदायिक सत्यनारायणाचे अनुष्ठान तेथील लोकांकडून करवून घेण्याचे श्रींच्या मनात आले. मठाधिपती वगैरे काही मंडळी म्हणाली की,बाजारात साखर,गहू,रवा मिळत नाही व एक महिना असले अनुष्ठान होणे शक्य नाही. पण एकंदर ८० सत्यनारायण झाले. त्यात सर्व लोकांनी भाग घेतला होता. समाप्तीला भंडाराही झाला.

आदिशक्तीचे साक्षात् दर्शन

     खेडला मठात राहत असतानाच तेथे नवीन बांधलेल्या गुहेत ध्यानास बसल्यावर सहज, इच्छा नसता, हृदयात आणि बाहेर श्री आदिशक्तीचे जे दर्शन झाले, {जून-जुलै १९४४} त्याचे वर्णन श्रींनी पुढीलप्रमाणे करून ठेवले आहे.
                      
वृशस्कंधारुधं परमारुचीराम सस्मितमुखी ।त्रीशुलाढ्यां पद्माभयवरकरां नित्यासुखदाम् ।।सुवर्णाभां दुर्गां दुरितहरिणीं रक्तवसनाम् ।नमाम्यन्तर्बाह्ये नयनविषयं विश्वजननीम् ।।
         
येथे मुक्काम असतानाच एकदा रिद्धी –सिद्धी स्त्री रुपात आल्या . श्रींनी विचारले ‘कोण आहे? काय पाहिजे?' तेंव्हा श्रींना उत्तर आले, ‘आम्ही रिद्धी-सिद्धी आहोत,आम्हाला सेवेला ठेऊन घ्या.’ तेंव्हा श्रींनी उत्तर दिले,'रिद्धी सिद्धी आमच्या वाटमा-या आहेत, तरी कृपा करून येथून निघून जा.’ तेंव्हा त्यांनी उत्तर दिले की, उत्तर हिंदुस्थानात एका साधूची जशी न दिसता सेवा केली तशी न दिसता सेवा करू. निदान आमच्या कल्याणासाठी तरी आम्हास सेवा करू द्या.पण श्रींनी या गोष्टीस ठाम नकार दिला व श्रीरामरायाची प्रार्थना करून या उपाधी मागे लावू नयेत अशी विनंती केली .

श्री गुरुगीता प्रबोधिनीचा जन्म

         येथील मुक्कामातच कार्तिक शु. ४ व ५ शके १८६५ या दोन दिवसात ‘ श्रीगुरुगीता प्रबोधिनी' ही स्कंद पुराणातील गुरुगीतेवरील प्राकृत टीका लिहिली गेली व ती  श्री आळ्याच्या महाराजांना समर्पित केली गेली.या वर्षाच्या अखेरीस श्रींनी खेड सोडून चासकमान येथे आपला मुक्काम हलविला.

प्रभुपद अंकित भूमी

यानंतर श्रींचे वास्तव्य खेड तालुक्यातील 'चासकमान' या गावी दीर्घकाळ झाले. तेथे विठ्ठल मंदिर होते व त्यास लागून स्वतंत्र मठ होता. तेथे श्री राहत असत. चासकमानला नदीकाठी श्री हाटकेश्वराचे मंदिर असून भीमेला सुंदर घाट बांधलेला आहे. १९५२-५३ पर्यंत तरी स्थान रम्य होते.आता कदाचित पडझड झाली असेल. चासकमान ला पूर्वी श्री अाळ्याचे महाराजही बरेच वर्ष होते. त्यावेळी लोक त्यांना 'गारगोटे स्वामी' म्हणत असत. ही भूमी {गुरु} प्रभुपद  अंकित असल्यानेच कदाचित श्रींनी वास्तव्यासाठी हिची निवड केली असेल.

 लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य 
   

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी