प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १६

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १६

🌹 गुरूचरणी अनुवादनमानस अर्पण 🌹

लगेचच श्री आळ्याच्या महाराजांना पत्र लिहून याप्रमाणे अनुवाद लिहून झाल्याचे कळविले व दर्शनाविषयी अनुज्ञा मागितली. ता. ६/११/४५ व ७/११/४५ या दोन दिवसांत श्रीरामाची, बाबा गंगादासांची व श्रीरामायणाची वगैरे विविध आरत्या तयार झाल्या व तोपर्यंत श्रींची अनुज्ञा मिळाल्याने श्रीमहाराजांचे दर्शनास श्रींचे जाणे झाले. 
      श्रींनी श्री आळ्याच्या महाराजांना मराठी रामचरितमानस (हस्तलिखित) वाचून दाखविण्यास सुरूवात केली. ते जसजसे वाचू लागले, तसतसे श्री आळ्याच्या महाराजांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. काही ठिकाणी तर ते अगदी हुंदके देऊन ओक्साबोक्शी रडूच लागले. इकडे श्रींचाही वाचताना कंठ भरून येऊन, डोळ्यांतून अश्रुधारा अशी कठीण अवस्था होऊ लागली. शेवटी अशा रीतीने मधूनच थांबत, तो अनुवाद श्रीमहाराजांना अधून मधून वाचून दाखविला व त्यांचा अभिप्राय व आशीर्वाद मागितला. तेव्हा असा असा लिहून आणा म्हणून आज्ञा झाली व त्याप्रमाणे लिहून आल्यावर श्री आळ्याच्या महाराजांनी खाली सही केली. तो अभिप्राय आणि आशीर्वाद असा - 
धन्योsसि कृतकृत्योsसि पावितं स्वकुलं त्वया ।
अन्तः संतोषमापन्ना श्रुत्वा रामायणं वयम् ।।१।।
साकी : तुलसीदासकृत-काव्य कुसुमगत् मधुपः प्रज्ञानोsयम् ।
रामरचित मधु निजभाषायामर्पितवानस्मभ्यः ।।२।।
इदं रामायणं काव्यं जनानां सौख्यदायकम् ।
प्रीतिपात्रं भवेल्लोके शाश्वतं कीर्तिवर्धनम् ।।३।।
भुक्तिं भक्तिं च कैवल्यं ज्ञानं वैराग्यमेव च ।
सेवनादचिरान्नित्यं दास्यत्येष वरो मम ।।४।।

प्रत्यक्ष श्रीगुरूंनी 'धन्योsसि कृतकृत्योsसि पावितं स्वकुलं त्वया' असे ज्यांच्याबद्दल म्हटले, त्यांचे भाग्य व थोरवी शब्दात वर्णन करणे कुणाला तरी जमेल का? खुल्या दिलाने शिष्याची अशी भलावण करणारे असे श्रीसद्गुरूही विरळाच; आणि प्रत्यक्ष श्रीगुरूंनी नावाजले असताही ज्यांना अहंकाराचा स्पर्शही झाला नाही असे श्रींच्या सारखे शिष्यही विरळा!

लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी