प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १७
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १७
याप्रमाणे बघता बघता १९४५ साल संपले व १९४६ साल उजाडले. यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता. 'चले जाव' आंदोलन सुरूच होते. त्यातच हैद्राबादमध्ये रझाकारांनी अनन्वित अत्याचार सुरू केल्याच्या बातम्या सारख्या कानावर येऊन थडकू लागल्या. संन्यास घेण्यापूर्वी श्रींनी रामदासी संप्रदाय स्वीकारला होता व त्यांच्यावर श्रीसमर्थांचा व त्यांच्या वाङमयाचा फार खोल परिणाम झालेला होता. ते संस्कार यावेळी बळावून 'अहो हिंदूंनो, संघ संपन्न - व्हावे.' 'हिंदूंनो डोळे उघडा' 'दूर करी शीघ्र जाच हा' 'श्रीसमर्थ प्रार्थनाष्टक' यासारखी काव्ये निर्माण झाली. यातील काही तत्कालीन 'केसरी' सारख्या वृत्तपत्रातून प्रसिद्धही झाली.
🌹 गुरूदर्शनाची ओढ 🌹
🌹 विपुल काव्यलेखन 🌹
एकदा आळे येथे गेले असतानाच, कीर्तनासाठी उपयुक्त असे 'भार्गव-दर्प-विमर्दन' हे व 'हिराबाई'
चे एक अशी दोन आख्यान लिहिली गेली. (२ ते ४ सप्टें. १९४६ व ७ सप्टेंबर १९४६)
याच वर्षी चास येथे 'श्री हनुमान-चालिसाचा' मराठी अनुवाद चौपायांतच झाला. श्रींचे वास्तव्य जेथे असे तेथे बहुतेक करून 'दासनवमी' चा उत्सव साजरा होत असे. चासच्या अशा उत्सवाचे वर्णन श्रींनी काव्यात केलेले आढळते. तसेच अकरा 'मनाचे श्लोक' त्यांनी हिंदीत अनुवादित केलेलेही आढळून आले.
श्रींचे वास्तव्य बहुधा चास-कमानलाच होते. पण अधूनमधून नगर, बार्शी, कडूस इत्यादी ठिकाणांहून लोक दर्शनास येत असत. पण एकंदर श्रींची वृत्ती प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने आपणहून कोणी शोध घेत दर्शनास आले तर, अन्यथा आपले नाव व्हावे अशा हेतूने चुकूनही एखादी गोष्ट त्यांचेकडून घडत नसे. शिवाय वृत्ती अत्यंत प्रेमळ पण निस्पृह, त्यामुळे 'निस्पृहस्य तृणं जगत्' अशी वागणूक असे. सत्यभाषणावर अत्यंत कटाक्ष. शिस्त व नियमितपणा यांची आवड. कुणी बेशिस्त वागले, थट्टेतही खोटे बोलले, आपला शब्द पाळला नाही तर निर्भीडपणे त्याची हजेरी घेतली जाई. त्यामुळे एक प्रकारचा दरारा सर्वांनाच वाटे. त्यांच्या समक्षच काय, पण माघारीही गैरवर्तन करण्याची शिष्यवर्गास हिंमतच होत नसे. असे असले तरी चूक झाली आणि प्रामाणिकपणे कबूल केली की लगेच क्षमा केली जाई. दांभिकतेची मात्र अत्यंत चीड असे.
🌹 हा स्वामी तुमचा आहे 🌹
त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना श्रींची माहिती कळली. तेव्हा ते व त्यांचा मुलगा चि. तात्या असे दोघे पुण्याहून सायकलवरून चासला श्रींच्या दर्शनास गेले. ही ह्या लाडक्या शिष्याची व श्रींची पहिली मुलाखत. श्री. ना. भा. जोशी यांच्या मनात ब्रम्हचर्याश्रम आणि वानप्रस्थाश्रम यांची सांगड घालून महाराष्ट्रात काही सामाजिक कार्य करावे अशी इच्छा अनेक वर्षे होती. श्री. जोशी, उभयता पितापुत्र चासला गेले तो दिवस ता. ४/४/४७ हा होता. दुपारी ११/१२ च्या सुमारास ते चासला पोहोचले व स्नान करून दर्शनास विठ्ठलमंदिरापलीकडील मठात गेले. दर्शन घेऊन सन्मुख बसल्यावर हळूहळू श्री. जोशी यांनी आपला मनोदय व आपली अपेक्षा बोलून दाखविली. त्यावर श्रींनी 'प्रत्येकाने आपापली उन्नती करून घ्यावी. समाजापुढे आदर्श निर्माण झाला की त्याचा खूप उपयोग होतो. सर्व समाज सुधारणे ही गोष्ट सोपी नाही.' अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. त्यानंतर बराच वेळ मनमोकळी चर्चा झाल्यावर शेवटी 'तुम्ही कोणतेही कार्य करा. हा स्वामी तुमचा आहे.' या शब्दात निःसंदिग्ध आश्वासन श्रींनी दिले तेव्हा श्री. जोशी यांना परम समाधान प्राप्त झाले.
लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Comments
Post a Comment