प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १८
१९४७ मधील एप्रिल महिना होता. १२ तारीख, म्हणजे कदाचित् रामनवरात्रातील एखादा दिवस असण्याची शक्यता आहे. रोजच्याप्रमाणे श्रींचे प्रातःस्नान वगैरे झाल्यावर ध्यानास बसले असता व श्रींचा धनुर्धारी रूपाचा अभ्यास असताही, त्या दिवशी अचानक बालरूपाचे दर्शन झाले. श्रीराम, बालरूप, बसलेले, नीलवर्ण, दैदीप्यमान, स्मितहास्य, गालावर खूप लाली, कानात कुंडले, अंगात पिवळे झबले, कपाळावर पिवळा गोरोचन टिळक (उर्ध्व), हृदयावर झबल्यावर मौक्तिक मणिहार, मधून मधून कमरेची रत्नजडित मेखला दिसत होती. याप्रमाणे ता. १२ ला हेच रूप सारखे दृष्टीसमोर येऊ लागले. या रूपाचे वर्णन करणारे काव्य 'बालरूप रामचंद्र पूर्ण उगवला' हे त्याचवेळी तयार झाले. ते १५/४/४७ रोजी वहीत लिहून ठेवलेले आढळले. तसेच ता. १५/४/४७ या दिवशी असेच मनात न आणताही अकल्पित श्री महालक्ष्मी चतुर्भुज, कमलावर पद्मासन घातलेली, सुवर्णसदृशकांती, रक्तवस्त्र परिधान केलेली, वर अभय, खड्ग, शूल धारण केलेली असे दर्शन झाले. या महिन्यात श्रीरामस्तोत्र, भोजनविधि, संतासंत संगति, श्रीराम प्रातःस्मरण वगैरे स्फुट काव्ये अनेक निर्माण झाली. ता. २८/४/४७ ला अनेक नवीन वृत्ते श्रींनी केलेली संकलित केली गेली. याप्रमाणे नित्य साहित्यसेवा चालूच होती.
🌹 अनुष्ठान, राष्ट्रोन्नतीसाठी 🌹पुढील वर्षी ना. भा. जोशी यांच्या आग्रहावरून श्रींचे कुंडलला वास्तव्य झाले. कुंडलजवळ वीराण्णाच्या डोंगरावर श्री ब्रम्हानंद महाराजांचे स्थान असून तेथे त्यांची ध्यानास बसण्याची गुहा, पाण्याची कुंडे वगैरे असून त्या डोंगरावरच श्रींचा निवास झाला. तेथे गिरीवर श्री ब्रम्हानंदाच्या आज्ञेने श्रींनी ३९ दिवसांत १ कोटी ७५ लक्ष ६ हजार जप केला. श्री ब्रम्हानंदांनी राष्ट्रोन्नतीसाठी हे अनुष्ठान (१ कोटी प्रणवाचे) करावयास सांगितले होते. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर श्रींना श्रीब्रम्हानंद महाराजांचे समाधिस्थितीत दर्शनही झाले. यानंतर परत श्रींनी चास-कमानकडे प्रयाण केले व त्यावर्षीचा चातुर्मास चास-कमानलाच झाला.
यानंतर श्री. ना. भा. जोशी व श्री सद्गुरू प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी मराठवाड्यात निरनिराळ्या गावी संचार केला असावा असे दिसते. यातच फिरून परंड्यास श्रींचे येणे झाले. यासंबंधी असे कळते की, परांड्यास येण्याआधी श्रींची प्रकृती जरा बरी नव्हती म्हणून श्री. लक्ष्मणराव मुगावकर यांनी हवापालट म्हणून परांड्यास येण्याविषयी विनंती केली. इतक्यात तब्येत सुधारली म्हणून येण्याचे रद्द झाले. तो परत तब्येत बिघडली म्हणून परत येण्याचे ठरविले. तो परत तब्येत सुधारली. म्हणून श्रींनी सध्या येत नाही असे कळविले. तो फिरून तब्येत बिघडली म्हणून होकार कळविताच तब्येत सुधारली. यावरून ईश्वरी संकेतच परांड्यास जाण्याचा आहे असे समजून श्रींचे परांड्यास आगमन झाले. मळ्यात शंकराच्या देवळातच मुक्काम होता.
यावेळी रझाकार चळवळीचा जोर होता. गावात अशांत वातावरण होते. काही लोकांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्रे पाजळून तयार ठेवली होती. त्यावेळी लोकांना धीर देण्यासाठी श्रींनी सांगितले होते की, जर रझाकारांचा हल्ला झाला आणि स्त्रियांची बेअब्रू, विटंबना होण्याचा प्रसंग आला तर हा स्वामी संन्यासी असला तरी हातात तलवार घेऊन प्राणपणाने रझाकारांशी मुकाबला करून तुमचे संरक्षण करील'. येथेच जनताजनार्दनास सुख लागावे म्हणून श्रींनी मंत्रानुष्ठान काही काळ केले होते. ते झाल्यावर वातावरण शांत झाले.
लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Comments
Post a Comment