प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २२


प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २२

      🌹 रामवनचा अद्वितीय सत्कार 🌹


         सप्टेंबर १० पर्यंत १६ पारायणे पुरी झाली हाेती व शिवपुराण सांगणे संपून अभंग रामायणावर श्रींची प्रवचने सुरू हाेती. ६ - १० पर्यंत २५ पारायणे पुरी झाली. याच सुमारास रामवन ( मध्यप्रदेश, सतना ) येथे श्री प्रज्ञानानंद पेटिका स्थापन हाेऊन त्यात रामचरितमानस ( मराठी ) गूढार्थ चंद्रिका नमुना अंक, प्रस्तावना खंड, मानसमणितील श्रींचे सर्व छापील लेख व श्रींचा पत्रव्यवहार वगैरे पेटिकेत ठेवला गेला.
   फाल्गुन अखेर १०० पारायणे पुरी करावयाचा श्रींचा विचार हाेता. म्हणून मार्गशीर्ष पाैर्णिमेपासून ( दत्तजयंती ) १५/१२/१९५९ पासून मानसाची द्विदिन पारायणे सुरू झाली. या सुमारास श्रींनी १९५३ साली जी हस्तलिखित पंचरंगी पाेथी लिहून मानस संघ रामवनला दिली हाेती, ती त्यांच्या जागेत काेणी व्यक्तीने चाेरल्याचे पत्र रामवनहून आले हाेते. श्री रघुनाथांनी कदाचित ही परीक्षा घेतली असेल की श्रींना वाईट वाटते की काय? पण एखादी वस्तू काेणास दिली की तिचे काय झाले हा विचार करणे चूक असे श्रींचे मत असे, त्यामुळे ती हस्तलिखित पाेथी काेणी रामायणप्रेमी व्यक्तीने चाेरली असावी असे श्री म्हणाले.
    
🌹 पिशाच्चांचा कायमचा बंदाेबस्त 🌹

         १९५९ ते १९६२ या चारही वर्षी श्रींचे चातुर्मास परांडा येथेच झाले. पण १९६३ चा चातुर्मास लाेहार्‍यास झाला आणि १९६४ सालचा चातुर्मास उस्मानाबाद येथे झाला. त्यावेळी गरड वकिलांच्या वाड्यात माडीवर श्रींचे वास्तव्य हाेते. तेथे असताना श्रींची तब्बेत खूपच बिघडली हाेती. कमरेस नागीण झाली हाेती. ती जरा बरी झाली तो एक दिवस पहाटे प्रातःस्नानाच्या वेळी एकाएकी चक्कर येऊन माेरीत काेसळले. त्यावेळी जबरदस्त मार लागून दुखापत झाली. आरामखुर्चीवर बसावे लागे. भेंडीचे मूळ उगाळून लेप लावला जाई.
    श्रींचे वास्तव्य असताना, उस्मानाबाद येथे गरड वकिलांच्या वाड्यात, श्री भागवताचा सप्ताह झाला. श्री हनुमंताचार्य सप्ताह वाचन करत हाेते. त्या वाड्यात दाेन मृतात्मे हाेते. एक बाळंतीण व एक समंध. श्री भागवत सप्ताह वाचणाऱ्या आचार्यांना फार त्रास हाेऊ  लागला. दशम स्कंधाचे वाचन सुरू असता तर पिशाच्च्यांनी वाचणाराचे ताेंड बंद केले. पाेथी टाकून हणमंतातार्य माडीवर श्रींचे आसन हाेते तेथे पळत गेले. श्रींनी कमंडलूतील जल प्राेक्षण करून पिशाच्चाचे निवारण केले. त्यानंतर भागवत सप्ताह सुरळीत पुरा झाला. त्या काळात श्रींनी अनेकांना राेगमुक्त केले, अनेकांची पिशाच्चबाधा दूर केली!

🌹 शंकर पार्वतीचे अपूर्व दर्शन 🌹

उस्मानाबादला असता एके दिवशी संध्याकाळी ६।। वाजता स्नान करून गरड वकिलांच्या माडीवर श्री स्वतःच्या आसनाकडे चालले हाेते. गरड वकिलांचा छोटा मुलगा राम व राणी वडगांवकर ही मुले समाेर बसलेली हाेती. ताेच दक्षिणेकडच्या बाजूने नंदीवर बसून शंकरपार्वती श्री (स्वामी) जेथे आसनावर बसत तेथे आले. ही दाेन्ही लहान मुले 'शंकरपार्वती' म्हणून आेरडू लागली. स्वामींनी हातानी मुलांना गप्प बसण्याची खूण केली. श्री. वडगांवकर तेवढ्यांत आले, तेव्हा 'शंकरपार्वती आले आणि गेले, तू आता नंतर आलास. तुला काही दर्शन झाले नाही, या मुलांना दर्शन झाले!' असे श्री म्हणाले. तसेच 'हे चाैथे दर्शन' असेही त्यावेळी म्हणाले.
     
🌹 शेवट शेवटचे चातुर्मास 🌹

        १९६५-६६ सालचे चातुर्मास परांडा येथेच राम विश्रामधामात झाले. त्यानंतर १९६७ साली श्रींचे वास्तव्य लातूरला हाेते. तेथे श्रीराम मंदिराच्या पडवीत चातुर्मास झाला. हा श्रींचा २५ वा चातुर्मास हाेता, व हाच शेवटचा चातुर्मास ठरला. कारण पुढील वर्षीच, १९६८ मार्च २३ लाच ( फाल्गुन वद्य दशमी), श्रींनी प्रायाेपवेशन करून पार्थिव देहाचा त्याग केला. 

लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी