प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २३


प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २३

            🌹 महासमाधी 🌹



वज्रादपि कठाेराणि मृदूनि कुसुमादपि ।

लाेकाेत्तराणां चेतांसि काे हि विज्ञातुमर्हसि ।।

असे म्हणतात ना, ते अगदी खरे आहे. दुसर्‍याच्या दुःखाचा विचार मनात आला की, लाेकाेत्तर पुरूषांचे हृदय कुसुमाहून काेमल बनते. पण स्वसुखाविषयी स्वतःच्या, देहसाैख्याविषयी ते प्रसंगी वज्रापेक्षा कठाेर बनते. श्रींच्या संबंधीही असेच म्हणणे योग्य ठरेल.
    १९६६ पासून श्रींच्या मनात प्रायोपवेशनाने देहत्याग करण्याचा विचार घाेळत होता. जसे जसे दिवस लाेटू लागले तसा हा विचार बळावतच गेला. परांडा येथेच फाल्गुन वद्यात प्रतिपदेपासून प्रायोपवेशन करून देह ठेवण्याचे ठरविले आहे तरी कुणालाही पाैर्णिमेपर्यंत दर्शनास यावयाचे असेल त्यांनी यावे, याप्रमाणे सर्व शिष्यमंडळींच्याकडे पत्रे रवाना झाली.
    पू. श्री. गुळवणी महाराज व पू. श्री. श्रीधरस्वामी महाराज ह्यांनाही पत्राने हा निश्चय कळविला गेला. त्यांची, तसेच इतर अनेक विद्वान मंडळींची पत्रे आली की आपण हे उपाेषण करू नये. पण प्रत्यक्ष श्रीरामप्रभूंनी सांगितले तरच हा विचार रद्द करू अन्यथा एकदा ठरले ते ठरले असे श्रींनी कळविले.
     एकदा प्रायोपवेशनाने देह ठेवण्याचे पक्के ठरल्यावर प्रत्यक्ष प्रायोपवेशन सुरू करण्यापूर्वी, एखाद्या कार्यक्रमाची पत्रिका तयार करतात तशा उत्साहाने श्रींनी आपला सर्व कार्यक्रम, प्रायोपवेशनाने समाधिस्थ होणे आणि देहाची विल्हेवाट वगैरे सर्व गाेष्टी शास्त्राप्रमाणे लिहून ठेवल्या हाेत्या व ब्राम्हणांना बाेलावून सर्व गाेष्टी समजावून सांगितल्या हाेत्या.
    अगाेदर समाधी बांधण्यास श्रींचा विराेधच होता. देह कुठल्यातरी नदीत साेडून द्यावा, किंवा चार तुकडे करून जंगलात टाकून द्यावा असे म्हणत. पण अनेकदा सर्वांनी विनंती केल्यावरून समाधीचे मान्य केले.
  शिष्यमंडळींना पत्रे गेल्यावर एखादा अपवाद साेडून जवळ जवळ सर्वच मंडळी येऊन दर्शन घेऊन गेली. इतरही ज्यांना परिचय हाेता किंवा ज्यांना केवळ ऐकून माहिती हाेती अशी आसपासच्या परिसरातील मंडळी दर्शनासाठी येऊ लागली.
  'असे सकल रघुपती संपत्ती' अशी भावना श्रींची असल्याने श्रींनी सर्व वस्तूंची क्रमवार नाेंद वगैरे करून व कुठली वस्तु कुणाला द्यावी याची नाेंदही करून ठेवली होती. सेवाधर्म हा अतिकठीण आहे हे जाणून काेण काय म्हणेल याची पर्वा न करता मृत्यूपत्र - व्यवस्था पत्र लिहून ठेवले होते. त्यात कुठली वस्तू कुणाची हे लिहून ती वस्तू त्या व्यक्तीस प्रसाद म्हणून देण्याविषयी लिहिले होते. तसेच सर्वांनाच काही ना काही वस्तू भेट म्हणून, प्रसाद म्हणून दिली गेली होती व तसे लिहून ठेवले हाेते. आश्चर्य वाटेल, पण अक्षरशः सुतळीचा ताेडा, रद्दी, उरलेली शाई इत्यादीबद्दलही लिहून ठेवले हाेते. तसेच जी वस्त्रे पुरून टाकायची हाेती ती लगेच पुरावयास लावली. बरीच पुस्तके, ग्रंथ सज्जनगडावर देण्यास सांगितले. 'समाधीची जागा पाहिलीत का? पाहून या' असे दर्शनास येणाऱ्यास बजावीत. एखाद्या गावाला जाताना जशी आपण साग्रसंगीत तयारी करताे तशी श्रींची जणू एखाद्या मंगलकार्याला गावाला निघाल्याप्रमाणे शांतपणे, निर्विकार मनाने आणि प्रसन्न चित्ताने सर्व तयारी मोठ्या उत्साहाने चालली हाेती. ह्यावेळपर्यंत कुणा शिष्यांना त्यांच्या हितासाठी रागावले असतील तर त्यावेळी सर्वांना श्रींनी क्षमा करून टाकली हाेती व त्यांनाही दर्शनास येण्यासंबंधी कळविले हाेते.
   होळी पाैर्णिमेचा दिवस श्रींनी अन्न न घेता नुसतेच पाणी पिऊन काढला व दुसऱ्या दिवसापासून श्रींनी प्रायाेपवेशन सुरू केले. रामविश्रामधामांत खूप गर्दी हाेईल म्हणून श्रींनी श्री. विलासराव देशमुख यांच्या वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला होता, व म्हणून तेथेच सर्व साेय केली गेली. प्रायाेपवेशन फाल्गुन वद्य प्रतिपदेला सुरू झाल्यावर दररोज त्यांच्या दर्शनास शेकडाे, हजाराे भाविक येऊ लागले.
  श्रींनी पहिले सात दिवस सारखे रात्रंदिवस आलेल्या लाेकांबराेबर बाेलणे सुरूच ठेवले हाेते. अन्नपाणी एकदा वर्ज्य म्हटल्यावर त्याचे नावही नाही आणि बोलणे मात्र सारखे सुरू! पुढे लघवी रक्तासारखी लाल हाेऊ लागली. जिभेवर सर्व भेगा पडल्या, फाेड आले, पण श्रींना कशाची पर्वा नव्हती. कुणी 'आपण बाेलू नका' म्हणून विनंती केली तर 'जाऊ दे, आता हे मडके लवकरच फुटणार आहे' असे म्हणत.

🌹 काळजीत गेलेली नाथशष्ठी 🌹   

श्रींनी प्रथम सांगितले होते की नाथषष्ठीस बहुतेक देह सोडू. त्यामुळे नाथषष्ठीला मंडळी काळजीतच हाेती. नऊ दिवसांचे तुळशीरामायणाचे पारायण चालूच हाेते. रामायणाची आरती झाल्यानंतर सर्वांची विचारपूस, बाेलणे वगैरे रोजच्या प्रमाणेच चालू हाेते. दिवसभर रामनामाचा गजर हाेत हाेता. संध्याकाळी ५ वाजण्याचे सुमारास नित्याप्रमाणे श्री स्नानगृहात स्नानास गेले आणि स्नानास बसताना एकाएकी काेसळले. धावाधाव सुरू झाली. साेवळ्यात मंडळी सारखी कुणी ना कुणी असत. त्यांनी घाेंगडी घातली. दर्भ अंथरले. तुळशी टाकल्या. व काहीनी श्रींना स्नानगृहातून बाहेर आणले. त्यावेळी श्री थाेडे शुद्धीवर आले. त्यामुळे त्यांना घाेंगडीवर न ठेवता पलंगावर धरून बसविले! थोड्या वेळाने श्रींनी सांगितले, 'अजून अवकाश आहे, घाेंगडी काढून टाका.' घाेंगडी वगैरे काढण्यात आली. श्रींना ग्लानी हाेती म्हणून पलंगावर बसविले. रात्री ९ च्या सुमारास श्रींना बरे वाटले; त्यावेळी एकाने विचारले, 'जलप्रवेश, पर्वतपतन, प्रायाेपवेशन इत्यादी मार्गाने देहत्याग करणे योग्य आहे का?' त्यावर श्रींनी 'वृद्धयतीनी असा देहत्याग करू नये, पण यतीवृद्धांना असे करण्यास हरकत नाही' असे सांगितले. साै. जोशी ( श्री. माधवराव जोशी यांच्या पत्नी ) तेथे सोवळ्यांत सेवेसाठी असत. श्रींच्या जिभेवर भेगा पडल्या हाेत्या म्हणून मुळी लावताना श्रींची ती अवस्था पाहून जरा त्यात दाेन थेंब पाणी जास्त घातले. त्या मुळीचा लेप लावू लागल्यावर ते गंध पाणी जास्त घातल्याने पातळ झाल्याचे श्रींना जाणवले. तेव्हा 'आम्ही एकदा अन्नपाणी वर्ज्य असे ठरविले असता, तू त्यांत जास्त पाणी का घातलेस?' म्हणून तशा परिस्थितीतही त्यांनी कानउघडणी केली.
  नंतर दुसरे दिवशी रामायणाचे पारायण चालू असता श्रींनी, 'आज याेग काेणता आहे?' असे विचारले. 'आज परिघ याेग आहे,' म्हणून सांगितल्यावर श्री  म्हणाले, 'आज जायचे नाही' ताे दिवस नित्याप्रमाणेच गेला. प्रकृतीत फारसा फरक भासला नाही.

लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

  1. Harrah's Lake Tahoe - Mapyro
    Harrah's Lake 경주 출장안마 Tahoe locations, rates, 전라남도 출장마사지 amenities: expert Lake Tahoe research, 남원 출장안마 only at Hotel 아산 출장마사지 and Travel Index. Realtime driving directions 이천 출장마사지 to Harrah's Lake Tahoe,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी