प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २०
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २०
🌹 मानसमणि सहयोग 🌹
त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे १९५० पासूनच श्रींनी 'मानसमणि' या रामवन, सतना, मध्यप्रदेश येथून प्रसिद्ध होणाऱ्या, तुलसीरामायणावरील लेखांना प्राधान्य देणाऱ्या हिंदी मासिकाचे ग्राहकत्व स्वीकारले होते. १९५२ च्या नोव्हेंबर महिन्यात या 'मानसमणि'च्या अंकात 'मानस (काव्य) दोषारोपण विराकरण' हा श्रींचा लेख प्रसिद्ध झाला. तो वाचून इंटर पास होऊन पोस्टात नोकरी करणाऱ्या श्री धनसिंह भदौरिया नावाच्या (कानपूरजवळील परौख, पोस्ट नोचारी, जिल्हा कानपूर) तरुणाचा दर महिन्यास ६/७ शंका, समाधानासाठी श्रींच्याकडे येऊ लागल्या. व त्या टीकालेखनसमाप्तीपर्यंत नियमीतपणे येत होत्या. त्यामुळे सुमारे १५० शंकांचे समाधान श्रींना मानसाधारे करण्यास सापडले व टीकालेखनास फार मदत झाली. आश्चर्यकारक घटना ही की, टीकालेखनसमाप्ती व त्या भैय्या धनसिंह भदौरियाचे देहावसान समकालीच झाले. श्रींचे प्रत्यक्ष दर्शन त्यास अखेरपर्यंत झाले नव्हते. ही अनपेक्षित ईश्वरी योजना अगदी थक्क करणारीच आहे. हा पत्रव्यवहार चालू असताना श्री धनसिंह भदौरिया यांनी एका पत्रात, श्रींना आपणास अनुग्रह देण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर श्रींनी अंतर्ज्ञानाने त्याची योग्यता जाणून त्यास संकल्प दीक्षा दिली होती! त्यावेळी हा मुलगा अल्पायुषी दिसतो असे श्री म्हणाले होते आणि तेच खरे ठरले!
यानंतर सप्टेंबर १९ ला रविवारी श्रींचे आसन परत इस्लामपूरला आले. यावर्षीची दिवाळीही फार आनंदात गेली. दिवाळीच्या पाडव्याला अनेकांना श्रींनी मंत्रोपदेश दिला. यावेळी सर्वांना ध्यानास बसवून श्री विविध बीजोच्चार करीत व कुठल्या बीजोच्चाराचा कुणावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जाई.

🌹 'रामवन' यात्रा 🌹
या सर्व गोष्टींमुळे व 'मानसपीयूष' मधील श्रींच्या टीकेमुळे उत्तर भारतातील मानसप्रेमी लोकांना श्रींचे नाव सुपरिचित झाले व त्यांच्या दर्शनासंबंधी त्यांच्या मनात उत्कंठा उत्पन्न झाली. यामुळे 'रामवन' सतना येथून १९५३ मध्ये श्रींना चैत्रात रामनवरात्रात होणार्या 'मानसयज्ञा'साठी आग्रहाचे निमंत्रण आले. त्यावेळी श्रींचा मुक्काम चास-कमान येथेच होता. त्यामुळे चास-कमानहून पुण्यास येऊन मार्च ११ (बुधवार) १९५३ रोजी पुण्याहून 'रामवन' येथे श्रींनी प्रयाण केले. रामवनच्या मुक्कामात रोज संध्याकाळी ५ वाजता श्रींचे हिंदीमधून रामायणावर प्रवचन होई. महाराष्ट्रीयन, एक संन्यासी आणि मानसावर एवढे प्रभुत्व हे पाहून ऐकणारा दिग्मूढ होऊन जात.
रामवनचा परिसर अत्यंत रम्य होता. तेथे रामायणातील वर्णनानुसार 'मानस सरोवर' 'चारी घाट' इत्यादी निर्मिती केलेली आहे. तेथे कमळाच्या वेली मुबलक, म्हणून तेथे असता कमळाच्या पानावर जेवण वाढले जाई. मानसयज्ञासाठी कलकत्ता, छत्तीसगढ इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून लोक आले होते.
तेथून श्री स्वामीमहाराज जबलपूर येथे गेले. तेथे श्रींच्या हस्ते श्रीदत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तेथून गोंदिया येथे श्रींचे एक शिष्य श्री. राजवाडे हे Central Excise मध्ये नोकरीस होते, त्यांच्याकडे श्रींचा मुक्काम झाला. तेथे असताही टीकालेखन सुरूच होते. या मुक्कामातच श्री. राजवाडे यांनी श्रींचा 'वेदान्त-सार-अभंग-रामायण' हा ग्रंथ प्रकाशित केला.
यानंतर श्रींचे परत चासला आगमन झाले. रामवनहून श्री आल्याचे कळताच श्रींची शिष्यमंडळी मे-जूनमध्ये श्रींचे दर्शनास येऊन गेली. शिवाय त्यावर्षी श्रींना ६० वर्षे पुरी झाली म्हणून साठीशांतीनिमित्त चास-कमानला सद्भक्तांचा एक मेळावाही भरविला होता. (१५ मे १९५३) त्याचवेळी 'अभिनव रामायण' हा श्रींच्या स्फुटकाव्याचा संग्रह प्रसिद्ध करण्यात आला.
🌹 सगुण साक्षात्काराचा अपूर्व अनुभव 🌹
यानंतर सप्टेंबर १९ ला रविवारी श्रींचे आसन परत इस्लामपूरला आले. यावर्षीची दिवाळीही फार आनंदात गेली. दिवाळीच्या पाडव्याला अनेकांना श्रींनी मंत्रोपदेश दिला. यावेळी सर्वांना ध्यानास बसवून श्री विविध बीजोच्चार करीत व कुठल्या बीजोच्चाराचा कुणावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जाई.
'ग्लौं' उच्चाराबरोबर गणेश दर्शन, 'ऐं' बीजोच्चाराबरोबर सरस्वतीचे दर्शन, या प्रमाणेच 'द्रां', 'रां', 'हं' इत्यादी विविध बीजोच्चार करून परिणामांची नोंद घेतली जाई. सप्टेंबर १९ (१९५४) ला श्री इस्लामपूरला आले ते जुलै १ (१९५५) पर्यंत इस्लामपूरला होते. जूनमध्ये सगुणसाक्षात्कारासाठी सर्वांनी मिळून निर्जळ, निद्रारहित, मौनयुक्त अनुष्ठान करावे अशा विचार ठरला. त्याप्रमाणे ता. १६ जूनला असे अनुष्ठान सुरू झाले
त्यावेळी श्रींनी एक दिवस आधीच अनुष्ठानास सुरूवात केली होती. त्यात एकूण १४ स्त्री-पुरूषांनी भाग घेतला होता. ता. १८ ला सकाळी १० वाजता श्रींना एकट्यांना श्रीरामचंद्राचा सगुणसाक्षात्कार झाला. पदकमलांपासून कटीपर्यंत स्पष्ट दर्शन झाले. पुढे वर दृष्टी जाताच श्रींचे देहभानच हरपले! त्यावेळची श्रींची प्रेमविव्हल अवस्था पाहून सर्व मंडळी घाबरूनच गेली! नंतर सावध झाल्यावर श्रींनी सर्वांना आश्वासन दिले. या अनुष्ठानात इतर सर्वांना 'प्रेमभक्ती' प्रभूंनी देऊ केली.
या अनुष्ठानाची समाप्ती शनिवारी रात्री १२ वाजता झाली. पाणी, सरबत वगैरे सर्वांनी घेतले. या अनुष्ठानात अन्नावाचून सर्वांचेच ८२ तास गेले. पाण्यावाचून व झोपेवाचून ४८ तास तरी गेलेच. ज्यांना पुढे निभले नाही त्यांना ४८ तासांनी थोडे पाणी घेऊन विश्रांती घेण्याची परवानगी श्रींनी दिली होती. या अनुष्ठानात देवदेवतांची दर्शने, ध्यानाच्या व जपाच्या वेळी, अंतश्चक्षूसमोर सर्वांनाच झाली, दुसर्या दिवशी रविवारी ता १९ जूनला श्रींना सगुणसाक्षात्कार झाला. पण यावेळी आदले दिवशीसारखी स्थिती झाली तरी कुणी घाबरले नाही.
यानंतर १ जुलैला (शुक्रवारी) श्रींनी सातारला प्रयाण केले. यावेळच्या श्रींच्या सातारच्या मुक्कामात, ज्या विस्तृत टीकेच्या लेखनाचा प्रारंभ कार्तिक शु. प्रतिपदा शके १८७५ रोजी इस्लामपूर येथे झाला होता, ती परिशिष्ट लेखनासह श्रावण कृष्ण पंचमी शके १८७७ (८/८/५५) सोमवारी सातारा येथे लिहून पूर्ण झाली. (ही टीका डेमी आकाराची छापील पृष्ठे ६१०० होतील एवढी विस्तृत आहे.) त्यानंतर लगेच दुसर्या दिवसापासून म्हणजेच ९ आॅगस्ट पासून म्हणजे श्रावण कृष्ण षष्ठी ते चतुर्दशीपर्यंत रोज एक पारायण याप्रमाणे श्रींनी श्रीराम चरितमानसाची नऊ पारायणे करावयाची ठरविले. हे कळताच परगावहून मंडळी येण्यास सुरूवात झाली. यावेळीही श्रवणास रोज १४ जण बसत असत.
यानंतर आॅक्टोबर १ ला श्रींचे इस्लामपूरला आगमन झाले खरे, पण चारच दिवसांनी ते परत साताऱ्याला गेले. यानंतर आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस सातारला श्रींची प्रकृती बिघडली म्हणून श्रींचा मुक्काम परत इस्लामपूर येथेच झाला.
१९५६ चा आषाढ महिना लागताच पूर्वी ठरल्याप्रमाणे चातुर्मासासाठी म्हणून श्रींनी सांगली येथे विष्णुमंदिरात राहण्याचे ठरविले व त्याप्रमाणे १० जुलैला दुपारी श्री सांगलीस विष्णुमंदिरात जाऊन पोहोचले.
यावर्षी कृष्णेस महापूर येऊन आॅगस्ट ३ ला शुक्रवारी विष्णुमंदिराचा संपूर्ण पहिला मजला जवळ जवळ पाण्याखाली गेला. लोक नावेतून ये जा करू लागले. त्यांनी श्रींना गावात वस्तीसाठी येण्याचा आग्रह केला. पण श्रींनी निवासस्थान सोडले नाही. मात्र रोज दुपारी ११ चे सुमारास धाबळी नेसून ते हाेडीतून गावात जात व करपात्र भिक्षा करून हाेडीतूनच परत मंदिरात येत. चाेहाेंकडे पुराचे पाणी, मध्येच हे विष्णुमंदिर व त्यात एकटे श्री वस्तीला! पुराच्या पाण्याबराेबर नाग साप वाहत येत. तेही खिडकीजवळून जाताना दिसत.
१९५७ चा चातुर्मास इस्लामपूरला डाॅ. वैद्य यांच्या जुन्या वाड्यात स्वतंत्र जागेत झाला व ५८ चा चातुर्मास माधवनगर येथे श्री. नातूशेठ यांच्या बंगल्यात संपन्न झाला.
लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Comments
Post a Comment