प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १९
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १९
🌹 सांगली-सातारा जिल्ह्यातील वास्तव्य 🌹
याच वर्षी श्रींनी श्रीरामचरितमानसाची १०८ त्रिदिन पारायणे करण्याचे ठरवून त्याप्रमाणे पारायणास सुरूवात केली. साधारण पहाटे ६ ते ६।। ला वाचनास प्रारंभ होई आणि ११ ते ११।। पर्यंत वाचन पुरे होई. यावेळी प्रवास करावयाचा प्रसंग आलाच तरी त्या दिवशीचे वाचन संपल्यावर निघावे लागे व त्याच दिवशी रात्रीपर्यंत मुक्कामाचे स्थळ गाठावे लागे. या संकल्पाची पूर्ती ३१ आॅगस्ट १९५१ ला झाली.
यावेळी श्री. ना. भा. जोशी ह्यांनी दर्यापूर सोडले होते व ते इस्लामपूरमध्ये शिक्षक म्हणून काम करीत होते. ते रूकडीकर यांच्या घरी भाड्याने राहात व श्री. हरी गोविंद अष्टेकर यांच्या अंगणात रोज रात्री गीता व रामायण यांवर प्रवचने करीत. त्यांच्या प्रवचनात श्रींचा उल्लेख वारंवार होई. यामुळे इस्लामपूर येथील मंडळींना श्रींच्या दर्शनाची उत्कंठा लागली होती. पण श्री. ना. भा. जोशी ह्यांचेकडूनच कळले की, श्रींची त्रिदिन पारायणे चालू असल्याने इतक्या दूरवरचा प्रवास ठराविक वेळेत व्हावयास हवा, तेव्हा काय करावे असा विचार सुरू झाला. यावेळी तेथील एक डाॅक्टर श्री. बा. श्री. वैद्य यांनी त्यांची मोटार श्रींना आणण्यासाठी न्यावी अशी विनंती केली व ही व्यवस्था झाल्यावर श्री. ना. भा. जोशी ह्यांनी श्रींना कळविले. श्रींनी इस्लामपूरास येण्याचे मान्य केले.
३१ मार्च शनिवारी संध्याकाळी श्रींचे इस्लामपूर येथे प्रथम आगमन सायंकाळी ५।। वाजता झाले. त्यानंतर मात्र श्रींचा मुक्काम इस्लामपूर येथेच राहू लागला. त्यावेळी श्री. ना. भा. जोशी यांच्या घरी निवासाची व्यवस्था केली होती. सायंकाळी श्रींचे विठ्ठल मंदिरात प्रवचनही झाले व हा अपूर्व सोहळा समाप्त झाला.
नोव्हेंबर १९५१ मध्येच 'मानसपीयूष' ची द्वितीयावृत्ती निघत असल्याचे व बालकांडाचा प्रथम भागही प्रकाशित झाल्याचे कळले म्हणून श्रींनी श्री मानसपीयूषचे लागलीच ग्राहक होण्याचे संपादकांना पत्र लिहिले आणि त्या पत्राने संपादक इतके प्रभावित झाले की, त्यांचे पुढे १९५२ मध्ये श्रींना पत्र आले की परशुरामप्रसंगावर भाव लिहून पाठवावे. त्यावर श्रींनी आपणास व्याकरणशुद्ध हिंदी लिहिता येत नाही असे कळविल्यावरून त्यांनी कळविले होते की, आपण पत्रात जी भाषा लिहिता ती मला पसंत आहे. त्यामुळेच पुढे श्रींनी 'मानस गूढार्थ चंद्रिका' ही हिंदी टीका लिहावयास घेतली.
श्रींनी प्रथम हिंदीत टीका लिहिली व नंतर मराठीत तिची स्थळप्रत करून ती हिंदी टीका मानसपीयूषकडे धाडून दिली. यानंतर संपूर्ण अरण्यकांड, श्री रघुवीर विवाह, किष्किंधा व सुंदरकांड या भागाची टीका मराठीत लिहून त्यातील जे भाव 'मानसपीयूष'च्या प्रथम आवृत्तीत नव्हते ते हिंदी मानसपीयूषकडे पाठवले गेले. प्रथमावृत्तीचे ते ते विभाग संपादकांनी श्रींच्याकडे अवलोकनासाठी धाडले होते व त्याचे काम झाल्यावर ते परत संपादकांकडे धाडले गेले. टीकेला 'गूढार्थ - चंद्रिका' हे नाव हिंदी टीकालेखन सुरू असताना येथेच दिले गेले.
लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Comments
Post a Comment