प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ८
प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती चरित्र – भाग ८ ४. वानप्रस्थाश्रम आणि संन्यासग्रहण फेब्रुवारी १९३७ मध्ये नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर श्रींनी पायी सज्जनगडावर जाण्याचे ठरविले . त्यावेळी पहिल्या मुक्कामापर्यंत बाबा गंगादास श्रींच्या बरोबर होते . त्यांनी परत जाताना श्रींना शुभाशीर्वाद दिला होता. या यात्रेतच { चिंचणी-तारापूर ,कुलाबा जिल्हा ते सातारा जिल्ह्यातील सज्जनगड हे अंतर साधारण २०० मैल आहे . } साताऱ्याच्या अलीकडे १५-२० मैलावर दुपारी १२ चा सुमार झाला . पायही थकले होते. एका झाडाखाली विश्रांतीसाठी म्हणून श्री बसले. बरोबर शिदोरी काहीच नव्हती म्हणून सहज गीतेतील “ अनन्याश्चिन्तयन्तो माम् ” या श्लोकाचा विचार आला व श्रीरामप्रभू दुपारच्या भोजनाची काय व्यवस्था करतात पाहू या, असे वाटले . थोडा वेळ गेल्यानंतर लांबून एक शेतकरी येताना दिसला व हळूहळू तो श्रींच्या जवळ येऊन ठेपला . त्याने घोंगड्यातून शेंगा, गुळ,केळी वगैरे पुढे ठेऊन वंदन केले . श्रींना विस्मय वाटला आणि ...